रावसाहेब दानवेंनी पुन्हा उच्चारला "तो" वादग्रस्त शब्द
By Admin | Updated: May 25, 2017 15:04 IST2017-05-25T12:59:53+5:302017-05-25T15:04:31+5:30
शेतक-यांसोबत संवाद साधताना भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पुन्हा तो वादग्रस्त शब्द उच्चारला. यावेळी नेत्यांनी ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर दानवेंनी सारवासारव केली.
रावसाहेब दानवेंनी पुन्हा उच्चारला "तो" वादग्रस्त शब्द
>
ऑनलाईन लोकमत
नंदुरबार,दि.25- भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत शहादा तालुक्यातील नांदरखेडा येथे 500 शेतक-यांच्या उपस्थितीत शिवार संवाद यात्रेला प्रारंभ करण्यात आला. यावेळी दानवे यांनी शेतक-यांसोबत हितगूज करत संवाद साधला.
शहादा पालिकेचे नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांच्या नांदरखेडा येथील शेतात झाडाखाली बसून दानवे यांनी शेतक-यांच्या प्रश्नांवर चर्चा केली़. यावेळी त्यांच्यासोबत पालकमंत्री जयकुमार रावल, खासदार डॉ़ हीना गावित, आमदार डॉ़ विजयकुमार गावित, भाजपाचे विभागीय संघटनमंत्री किशोर काळकर, ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी, शहाद्याचे नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
दानवे यांनी प्रकाशा आणि सारंगखेडा या दोन बॅरेजमध्ये उपसा सिंचन योजना राबवण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे तसेच शेतक-यांच्या सर्व समस्या जाणून घेतल्यानंतर राज्यशासन शेतकरी हिताची कल्याणकारी योजना राबवणार असल्याचे सांगितले.
वादग्रस्त शब्द उच्चारल्यानंतर सारवासारव
शिवार संवाद यात्रेदरम्यान शेतक-यांसोबत हितगूज करणा-या रावसाहेब दानवे यांनी मनोगत पूर्ण करून शासकीय योजनेची माहिती देत असताना ‘त्याच’ वादग्रस्त शब्दाचे पुन्हा उच्चारण केल्याने बसलेले शेतकरी व कार्यकर्ते आवक झाले होते. नेत्यांनी ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर बोलीभाषेतील शब्द असल्याने उच्चार केला गेल्याची सारवासारव दानवे यांनी केली.