जिल्ह्यात आजपासून ८७ ग्रामपंचायतींसाठी रणधुमाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 15:05 IST2020-12-23T15:05:14+5:302020-12-23T15:05:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील एप्रिल ते ३१ डिसेंबर या कालावधीत मुदत संपणा-या ८७ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम लागू ...

जिल्ह्यात आजपासून ८७ ग्रामपंचायतींसाठी रणधुमाळी
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील एप्रिल ते ३१ डिसेंबर या कालावधीत मुदत संपणा-या ८७ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम लागू झाला आहे. यांतर्गत बुधवारपासून अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणार असल्याने तालुकास्तरावर निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्याची कारवाई पूर्ण करण्यात आली.
धडगाव तालुक्यातील १६, अक्कलकुवा एक, तळोदा ७, शहादा २७, नंदुरबार २२ तर नवापूर तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला होता. कार्यक्रमांतर्गत तालुका तहसीलदार कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त केले गेले आहेत. यात धडगाव तालुक्यासाठी आठ, अक्कलकुवा एक, तळोदा सात, शहादा २०, नंदुरबार १९ तर नवापूर तालुक्यासाठी ८ अधिकारी नियुक्त केले गेले आहेत. त्या-त्या कार्यालयात टेबल लावून ग्रामपंचायतनिहाय ऑनलाईन अर्ज दाखल केल्यानंतरचा अर्ज जमा करण्यात येणार आहे. जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेचे पालन सुरु असल्याची माहिती देण्यात आली आहे. २३ ते ३० डिसेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. या अर्जांची छाननी ३१ डिसेंबर रोजी होणार आहे. यानंतर ४ जानेवारी २०२१ पर्यंत माघारीची मुदत आहे. माघारीची मुदत संपल्यावर १३ जानेवारीपर्यंत निवडणूक प्रचार रंगणार आहे. १५ जानेवारी रोजी या ग्रामपंचायतींसाठी मतदान तर १८ जानेवारी २०२१ रोजी मतमोजणी होवून निकाल जाहिर होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान ८७ ग्रामपंचायतीत जिल्ह्यातील काही मोठ्या ग्रामपंचायतींचाही समावेश आहे. येथील निवडणूकांकडेलक्ष लागून आहे.