कालू बनलेल्या रमेशचे फोडले शहाणाने बिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2020 12:22 IST2020-11-15T12:22:32+5:302020-11-15T12:22:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : १२ नोव्हेंबर रोजी एलसीबीने सिंदीदिगर येथील अवैध दारू कारखान्यावर धाड टाकून एका व्यक्तीस अटक ...

कालू बनलेल्या रमेशचे फोडले शहाणाने बिंग
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : १२ नोव्हेंबर रोजी एलसीबीने सिंदीदिगर येथील अवैध दारू कारखान्यावर धाड टाकून एका व्यक्तीस अटक केली होती. त्याने आपले नाव कालूसिंग पावरा सांगितले होते. परंतु दुसऱ्या एकास संशयितास ताब्यात घेऊन त्याच्यासमोर कालूची चौकशी केली असता मुख्य संशयित असलेला कालू हा रमेश असल्याचे समोर आले. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपला लहान भाऊ कालूसिंग असून मी रमेश असल्याचे सांगितले. रमेश व कालूने पोलिसांनाही लाडू देत गुंगारा देण्याचा प्रयत्न केला.
याबाबत माहिती अशी, सिंदीदिगर शिवारात एलसीबीने धाड टाकून अवैध दारूचा कारखाना नष्ट केला होता. एकूण एक लाख ३१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला होता. मुख्य सूत्रधार कालूसिंग याला ताब्यात घेण्यात आले होते. त्याला म्हसावद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. तपासादरम्यान त्याने बनावट दारू बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल हा मलगाव येथील शहाणा जगन ढिवरे याच्याकडून आणत असल्याचे सांगितले.
पोलिसांनी मलगाव येथे जाऊन शहाणा ढिवरे यास ताब्यात घेतले. म्हसावद पोलीस ठाण्यात कालूसिंग व शहाणा यांना समोरासमोर बसवून पोलिसांनी चौकशी सुरू केली असता पोलिसांच्या तोंडून वारंवार कालूसिंग असे नाव उच्चारले जात होते. त्यामुळे शहाणा हा बुचकळ्यात पडला. रमेशला कालूसिंग म्हणून का पोलीस बोलत आहेत असा प्रश्न त्याला पडला. त्याने पोलिसांना हा कालूसिंग नसून रमेश असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांच्या भुवया देखील उंचावल्या. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपण रमेश खुमानसिंग पावरा असून आपला लहान भाऊ कालूसिंग खुमान पावरा असल्याचे सांगितले.
पोलिसांनी कारवाई केली तेंव्हा कालूसिंग याने आपल्याला गुन्हा अंगावर घेण्यास सांगून नाव कालूसिंग असेच सांगावे म्हणून बजावले होते. त्यानुसार आपण कालूसिंग हे नाव सांगितल्याचे त्याने स्पष्ट केले. पोलिसांनी देखील कपाळावर हात मारून घेतला.
याबाबत म्हसावद पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक किरण शांताराम पवार यांनी फिर्याद दिल्याने रमेश खुमानसिंग पावरा, रा.कुंड्या, ता.धडगाव, बेहरमसिंग दिवल्या पावरा, रा.कुंड्या, कुवरसिंग, मेहमल व खुनश्या रा.सिंदीदिगर, ता.धडगाव यांच्याविरुद्ध मुख्य संशयितास कायदेशीर शिक्षेपासून वाचविण्यासाठी खोटी माहिती देणे व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार भीमसिंग ठाकरे करीत आहे.