पावसाने रस्त्यांची पोलखोल केली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:36 IST2021-09-10T04:36:56+5:302021-09-10T04:36:56+5:30
पावसामुळे शहादा शहरात अनेक वसाहतींमध्ये रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. मुख्यतः नवीन वसाहतीतील रस्त्यात पावसामुळे मोठमोठे खड्डे निर्माण झाल्याने आणि ...

पावसाने रस्त्यांची पोलखोल केली
पावसामुळे शहादा शहरात अनेक वसाहतींमध्ये रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. मुख्यतः नवीन वसाहतीतील रस्त्यात पावसामुळे मोठमोठे खड्डे निर्माण झाल्याने आणि या खड्ड्यांत पाणी साचल्याने पादचारींना तसेच वाहनचालकांना खड्डे चुकवण्याची कसरत करावी लागते. खड्डे पाण्याने भरल्याने रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. पावसामुळे रस्त्यांच्या झालेल्या दुरवस्थेने रस्त्याची पोलखोल झाल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. गणेशनगर, भरतनगर, रमकुबाईनगर, मंगलमूर्तीनगर, वृंदावन कॉलनी, कुबेरनगर अशा अनेक नवीन वसाहतींमध्ये खड्ड्यांमुळे रस्त्यांची दुरवस्था झाल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. खड्ड्यामुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. जुना मोहिदा रोड व डोंगरगाव रोडला जोडणारा गणेशनगर, भरतनगर, रमकुबाईनगर, मंगलमूर्ती काॅलनी व शारदानगर या सगळ्या वसाहतींना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर खड्डे झाल्याने शहराच्या पूर्वेकडील नागरिकांना रहदारीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. काही वसाहतींतील खोलगट भागात तर पाण्याचे तळे साचल्याने रस्ते पाण्याखाली गेले आहेत. शुक्रवारी गणेश बाप्पांचे आगमन होणार असल्याने पालिकेने त्वरित रस्त्यांची डागडुजी करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.