शहादा व तळोदा तालुक्यात पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2020 12:51 IST2020-10-22T12:51:35+5:302020-10-22T12:51:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा/तळोदा : शहादा व तळोदा तालुक्यात बुधवारी पावसाने हजेरी लावली. परतीच्या या पावसाने पिकांचे नुकसान झाले ...

शहादा व तळोदा तालुक्यात पाऊस
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा/तळोदा : शहादा व तळोदा तालुक्यात बुधवारी पावसाने हजेरी लावली. परतीच्या या पावसाने पिकांचे नुकसान झाले आहेे. तळोदा शहरात दुपारी तर शहादा तालुक्यात सायंकाळी पावसाने हजेरी लावली.
तळोदा
तळोदा शहरात बुधवारी दुपारी अचानक पावसाला सुरूवात झाली. पावसामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतकऱ्यांचे धान्य ओले झाले होते. त्यामुळे व्यापारी व शेतकरी यांची तारांबळ उडाली होती. शहर व तालुक्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. यातू दुपारी तीन वाजेचा सुमारास अचानक पावसाला सुरुवात झाली. दहा मिनिटे पर्यंत पाऊस चालला होता. गेल्या सहा महिन्यापासून बंद असलेले मार्केट सोमवारपासून सुरू झाले आहे. यामुळे शेतकरी बाजारात माल घेऊन आले होते. याच दरम्यान पाऊस आल्याने धान्याला फटका बसला. पाण्यात धान्य खराब झाल्याने शेतकर्यांना अडचणी आल्या.
शहादा
शहादा तालुक्यातील बुपकरी, लांबोळा, डामरखेडा यासह विविध भागात सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे डामरखेडा परीसरातील महामार्गावर पाणी वाहने अडकून पडली होती. पावसामुळे शेतशिवाराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान तालुक्यात २४ ऑक्टोबरपर्यंत परतीच्या पावसाची हजेरी लागणार असल्याचा अंदाज आहे. यातून मंगळवारपासून शहादा शहर व तालुक्यात ढगाळ वातावरणासह वीजांचा कडकडाट सुरू होता. रात्री उशिरा अनेक भागात रिमझिम पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान बुधवार दुपारपासून म्हसावद, औरंगपूर, राणीपूर, भादा, पाडळदा, पिंगाणे यासह विविध भागात पाऊस सुरू होता. पावसामुळे प्रकाशा ते शहादा दरम्यान चिखल होवून वाहने अडकून पडली होती. चिखलामुळे सात ते आठ दुचाकींचे अपघात झाल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान पावसामुळे खळवाड्या तसेच घरांवर टाकलेले धान्य पावसात सापडून खराब झाले. शेतशिवारातही पावसामुळे नुकसान झाले आहे.
वाहतूक विस्कळीत
शहादा तालुक्यात दोन दिवसांपासून पाऊस सुरू असल्याची माहिती शेतकरी देत आहेत. यामुळे महसूल व कृषी विभागाने पंचनामा करुन शेतकर्यांना भरपाई मिळवून देण्यास मदत करण्याची मागणी करण्यात आली आहे. पावसामुळे तालुक्यातून जाणार्या विसरवाडी ते सेंधवा या राष्ट्रीय महामार्गाचे काम पुन्हा ऐरणीवर आले आहे. अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याने काही तासांसाठी वाहतूक ठप्प झाल्याचे बुधवारी दिसून येत होते. शेतकर्यांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले.