रेल्वे प्लॅटफाॅर्म तिकीट पुन्हा १० रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:21 IST2021-06-24T04:21:25+5:302021-06-24T04:21:25+5:30
नंदुरबार : रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफार्म तिकीट ५० रुपये करण्यात आले होते. यामुळे प्रवाशांची संख्या मर्यादित ...

रेल्वे प्लॅटफाॅर्म तिकीट पुन्हा १० रुपये
नंदुरबार : रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफार्म तिकीट ५० रुपये करण्यात आले होते. यामुळे प्रवाशांची संख्या मर्यादित झाली होती. दरम्यान, १ जूनपासून रेल्वेने प्लॅटफाॅर्म तिकीट पुन्हा १० रुपये केले असून, या निर्णयामुळे प्रवाशांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
रेल्वे मंत्रालयाने काेरोनाच्या पार्श्वभूमीवर प्लॅटफार्म तिकीट ५० रुपये करण्याचा निर्णय घेत तो अमलात आणला होता. यामुळे नातेवाइकांना सोडण्यासाठी येणारे नाराजी व्यक्त करत हाेते. परंतु, कोरोनाचा प्रभाव ओसरल्यानंतर अखेर प्लॅटफार्म तिकिटासाठी पुन्हा १० रुपयेच द्यावे लागत असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या चार महिन्यात महागड्या तिकिटामुळे रेल्वे फलाटावर जाण्याऐवजी बाहेरूनच नातेवाईक, आप्तांना देत रवाना करण्यात येत असल्याचे वेळाेवेळी दिसून येत होते.
नंदुरबार रेल्वे स्थानकातून एका आठवड्यात एकूण ३९ गाड्या चालवल्या जातात. यातील बहुतांश गाड्या या साप्ताहिक आहेत. तसेच चार गाड्या नियमित आहेत. या गाड्यांमधून प्रवासी वाढू लागले आहेत.
कोरोना काळात प्रवाशांची गर्दी होऊ नये, यासाठी प्लॅटफाॅर्मचे दर वाढविण्यात आले होते. हे दर वाढले असले तरी जवळचे नातलग किंवा कुटुंबातील सदस्यांना सोडण्यासाठी येणारे ते तिकीट काढून स्थानकात प्रवेश घेत होते. यातून रेल्वेला बऱ्यापैकी महसूल या चार महिन्यांत मिळाल्याची माहिती देण्यात आली.
रेल्वेकडून सुविधांवर भर
दरम्यान, फलाट तिकिटांबाबत स्टेशन मास्तर सुभाष मंडल यांना संपर्क केला असता तो होऊ शकला नाही. व्यावसायिक विभागाकडून प्लॅटफाॅर्म तिकिटाबाबत माहिती देण्यात आली. परंतु, अधिक माहितीसाठी झोनल जनसंपर्क विभागाला संपर्क करण्याचे सांगण्यात आले. रेल्वेकडून सध्या नंदुरबार रेल्वेस्थानकात सुविधा वाढविल्या जात असल्याची माहिती दिली गेली.