रघुवंशींच्या राजकीय ‘लॉकडाऊन’ संपला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2020 12:40 IST2020-11-08T12:40:50+5:302020-11-08T12:40:58+5:30

रमाकांत पाटील लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या अडीच दशकांहून अधिक काळापासून सक्रीय असलेले नेते चंद्रकांत रघुवंशी यांना ...

Raghuvanshi's political 'lockdown' is over! | रघुवंशींच्या राजकीय ‘लॉकडाऊन’ संपला !

रघुवंशींच्या राजकीय ‘लॉकडाऊन’ संपला !

रमाकांत पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

नंदुरबार : जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या अडीच दशकांहून अधिक काळापासून सक्रीय असलेले नेते चंद्रकांत रघुवंशी यांना शिवसेनेतर्फे राज्यपाल नियुक्त आमदारसाठी शिफारस करण्यात आली आहे. राज्यपालांची संमती मिळताच रघुवंशी चौथ्यांदा विधान परिषदेचे सदस्य होणार आहेत. त्यामुळे रघुवंशींचा राजकीय ‘लॉकडाऊन’ही एकप्रकारे संपणार आहे. गेल्या आठ महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे राजकीय घडामोडींपासून अलिप्त असलेले रघुवंशी आता पुन्हा सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमात सक्रीय होणार असून रविवारी सुमारे २५ कोटींपेक्षा अधिक रकमेच्या विकास कामांचा शुभारंभ ते करतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाईन या कार्यक्रमाचा शुभारंभ करणार असल्याने त्याचे महत्त्व अधिकच वाढले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून राजकारणात आलेले चंद्रकांत रघुवंशी यांची राजकीय कारकिर्दीची सुरुवात ही निश्चितच वडील कै.बटेसिंग रघुवंशी यांच्या वारसाने झाली. पण पुढे मात्र त्यांनी आपल्या स्वत:च्या कामगिरीचा ठसा उमटवला. धुळे आणि नंदुरबार जिल्हा एकत्र असताना धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सांभाळताना त्यांनी आपले नेतृत्व कौशल्याने आपली स्वत:ची छाप निर्माण केली. त्याच काळात ते राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष संघटनेचे अध्यक्ष झाले. भास्कर वाघ प्रकरणाने बदनाम झालेल्या धुळे जिल्हा परिषदेला नवी ओळख करुन देण्यात ते यशस्वी ठरले. म्हणूनच त्यांची राजकीय कारकीर्द पुढे प्रगल्भ होत गेली. विधान परिषदेचे सदस्य झाल्यानंतर आपल्या वक्तृत्व कौशल्याने ते विधान परिषदेतही उत्कृष्ट वक्ते ठरले. गेल्यावर्षी राजकीय सत्तांतराची लाट आली होती. त्यात रघुवंशी यांनीही भविष्यातील राजकारणाचा वेध घेत आमदारकीचे दीड वर्ष बाकी असताना त्याचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश केला. पुढे विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय समीकरणेही बदलली. पण शिवसेनेकडे मात्र राज्याची सत्ता आल्याने त्यांचा राजकीय प्रवेश हा फलदायी ठरला. मात्र आठ महिन्यापासून कोरोना महामारीचा नवा अध्याय सुरू झाला. त्यामुळे सुरू झालेल्या लॉकडाऊनने सर्व समीकरणे बदलली. हा काळ रघुवंशी यांच्यासाठीही अंतर्गत संघर्षाचा राहिला. प्रकृती अस्वस्थतामुळे त्यांनीही राजकीय संयम ठेवत राजकीय आणि सामाजिक जीवनापासून आपल्याला अलिप्त ठेवले. जिल्हा परिषदेच्या अंतर्गत राजकारणात त्यांनी अधूनमधून आपली छबी दाखवली. पण जाहीर राजकीय भाष्य मात्र करण्याचे टाळले. राज्यपाल नियुक्त आमदारांची चार महिन्यांपासून चर्चा सुरू होती. मुंबईत माध्यमातून सुरू असलेल्या चर्चेत रघुवंशी यांचे नाव मात्र कधीही आले नाही. त्यामुळे स्थानिक स्तरावरही त्यांचे समर्थक आणि विरोधकांमध्ये चर्चेच्या माध्यमातून पडसाद उमटत राहिले. विरोधकांनी तर रघुवंशी यांचे राजकारण आता संपले, अशीच चर्चा सुरू केली होती. पण रघुवंशींनी मात्र त्यावर पूर्ण संयम ठेवून कुठलीही जाहीरपणे वाच्यता केली नाही. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या शब्दावर विश्वास ठेवला आणि अखेर उद्धव ठाकरे यांनीही आपला शब्द पाळला आणि रघुवंशी यांच्या नावाची शिफारस केली आहे. हे वृत्त अधिकृतपणे जाहीर झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये आनंद होणे स्वाभाविकच आहे. आता सर्वांचेच लक्ष राज्यपाल अधिकृतपणे नावे कधी घोषित करतात त्याकडे लागले आहे. अर्थात ही घोषणा कधी होईल ते होवो पण रघुवंशी मात्र पुन्हा आपल्या सामाजिक व राजकीय जीवनात सक्रीय झाले असून रविवारच्या उद्‌घाटन व भूमिपूजन सोहळ्यानंतर ते पुन्हा जोमाने कामाला लागतील. नंदुरबार शहर आणि जिल्ह्याच्या विकासाच्या त्यांच्याकडून जनतेच्याही खूप अपेक्षा असल्याने त्यांचे या नवीन पक्षातील पुनरागमनाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Web Title: Raghuvanshi's political 'lockdown' is over!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.