पालिकेच्या सभेत अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 14:26 IST2019-11-17T14:26:07+5:302019-11-17T14:26:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : बसस्थानक ते दोंडाईचा रस्त्यावर पुन्हा अतिक्रमण झाल्याने हा रस्ता गायब झाला आहे. त्यामुळे रस्ता ...

पालिकेच्या सभेत अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : बसस्थानक ते दोंडाईचा रस्त्यावर पुन्हा अतिक्रमण झाल्याने हा रस्ता गायब झाला आहे. त्यामुळे रस्ता की, अतिक्रमण अशी परिस्थिती शहराची निर्माण झाली आहे. पालिका कार्यालयाभोवतीदेखील अतिक्रमण झाले असल्यामुळे प्रशासन करते तरी काय असा प्रश्न प्रा.मकरंद पाटील यांनी उपस्थित केल्याने अतिक्रमनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शहरात स्वच्छतेचा अभाव, आरोग्याचा प्रश्न, मोकाट कुत्रे व वराहांचा उपद्रव आदीं प्रश्नांवर शनिवारी पालिकेची सर्वसाधारण सभा गाजली.
नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेची सर्वसाधारण सभा घेण्यात आली. याप्रसंगी उपनगराध्यक्षा रेखा चौधरी, मुख्याधिकारी राहुल वाघ, प्रशिक्षणार्थी मुख्याधिकारी गायकवाड आदी उपस्थित होते. या सभेत 15 विषय होते. त्यातील वाढीव पाणीपुरवठा योजनेची सुरक्षा अनामत व बँक गॅरंटी ठेकेदाराला परत करण्याच्या विषयाला नगरसेविका विद्या जमडाळे यांच्यासह नगरसेवकांनी विरोध केला.
घनकचरा ठेक्यास तात्पुरती मुदत वाढ देण्याच्या विषयावर मकरंद पाटील यांनी आक्षेप घेत तीन वर्षापासून मुदतवाढ दिली जात असून, त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना का केली जात नाही या दिरंगाईस जबाबदार असणा:यांवर कारवाई करण्यात यावी तसेच दोंडाईचा रस्त्यालगत बनविलेल्या फूटपाथवर अतिक्रमणे झाली असून, फुटपाथपुढेच हातगाडय़ा लागतात मग रस्ता आहे तरी कुठे, या जागेवर लहान दुकाने बनविली असती तर पालिकेलाही उत्पन्न मिळू शकले असते. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शहरात अतिक्रमण वाढले असून, रस्ते गायब तर अतिक्रमणाचा सुळसुळाट अशी स्थिती शहराची असल्याचे सांगत पाटील यांनी प्रशासनाला धारेवर धरले.
प्रशांत निकुंभ यांनी प्रभाग 12 मधील समस्यांचा पाढा वाचताना समस्या दूर होत नसतील तर मी राजीनामा देऊ का असा उद्विगA प्रश्न केला. तसेच वाहिद पिंजारी, लक्ष्मण बढे यांच्यासह नगरसेवकांनी शहरात पथदिवे बंद राहतात, स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे, डेंग्यूची साथ सुरू असून, मोकाट कुत्रे व वराहांचा उपद्रव शहरात वाढला आहे. रस्त्यावर साफसफाई होत नसल्याने धुळीचे साम्राज्य पसरले आहे. मात्र पालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला जात आहे. शहरात 271 दिव्यांगांची नोंदणी झाली असून, त्यांना शासन नियमानुसार डीबीटीद्वारे अनुदान दिल्याची माहितीही देण्यात आली. रियाज कुरेशी, इकबाल शेख, संदीप पाटील यांनीही अनेक प्रश्नांना हात घालीत आरोग्यविभागाला धारेवर धरले.