शहादा तालुक्यातील कृषी दुकानदार यांची बी-बियाणे उमगची गुणवत्ता अद्यापही तपासणी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:22 IST2021-06-03T04:22:26+5:302021-06-03T04:22:26+5:30
बामखेडा : गतवर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी यावर्षी नुकताच मशागतीला लागला असून, यासाठी लागणारे बी-बियाणे भरण्यासाठी सज्ज झाला आहे. ...

शहादा तालुक्यातील कृषी दुकानदार यांची बी-बियाणे उमगची गुणवत्ता अद्यापही तपासणी नाही
बामखेडा : गतवर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी यावर्षी नुकताच मशागतीला लागला असून, यासाठी लागणारे बी-बियाणे भरण्यासाठी सज्ज झाला आहे. या कृषी दुकानदारांनी आपल्या दुकानात खते, बी-बियाणे, औषधी भरून ठेवले आहे.
परंतु गतवर्षी शहादा तालुका व परिसरातील काही कृषी दुकानदारांनी कंपनीशी संगनमत करून परिसरातील काही शेतकऱ्यांना बोगस बियाणे विक्री केल्याची घटना घडली होती.
यावर्षीही कृषी दुकानदार सज्ज झाले. परंतु संबंधित विभागाने बोगस बियाणे विक्री करणाऱ्या दुकानाकडे लक्ष देऊन या दुकानात असलेले बी-बियाणे औषध याची गुणवत्ता तपासणी करणार का? की पुन्हा गतवर्षीसारखेच अशा दुकानदाराकडे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष करून त्यांना मोकळे सोडणार का? असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात पडलेला आहे. बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात संकट कोसळले होते. त्यामुळेच शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली असल्याने शेतकरी हतबल झाला होता. त्यातच गतवर्षीपासून कोरोनाने जगभरात थैमान घातले असल्यामुळे, जनसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांचे जगणे मुश्किल झाले असल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. त्यातच शासनाकडून कोरोनाचे रुग्ण वाढू नयेत याकरिता वारंवार लाँकडाऊन जाहीर करण्यात येते. त्यामध्येदेखील शेतकऱ्यांची पिळवणूक होत असल्याचे दिसून येत आहे.
यंदा तरी कृषी विभागाने परिसरात असणाऱ्या कृषी दुकानातील बी-बियाण्याची उगम क्षमता व त्याची गुणवत्ता तपासणी करून ज्या कृषी दुकानदाराकडे बोगस बी-बियाणे निघतील त्यांच्यावर कडक कारवाई करून अशा दुकानांचे कृषी परवाने रद्द करावेत. तसेच शेतकऱ्यांनी आता कोणते बियाणे खरेदी करावे यासाठी मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. परंतु अद्यापही बहुतांश शेतकऱ्यांना अजून मार्गदर्शन मिळालेले नाही. त्याचबरोबर कोणत्याही दुकानातील बियाण्याची उगवण क्षमता तपासली नाही. त्यामुळे शेतकरी पुन्हा संभ्रमात पडला असल्याचे दिसून येत आहे.
गतवर्षी सोयबीनचे तसेच कापसाचे बी-बियाणे बोगस निघाले, त्यातच काही दुकानदारांनी खतांसाठी जाणूनबुजून अडथळा निर्माण केला. युरियाचा स्टॉक शिल्लक असतानाही शेतकऱ्यांना ताटकळत ठेवले. यंदाही तीच परिस्थिती येऊ नये, आम्ही शेतकरी बँका, खासगी सावकार यांच्याकडून हजारो रुपये कर्ज घेऊन शेती करतो अन् जर दुकानदार बोगस बी-बियाणे देऊन आमची लूट करत असेल तर कृषी विभागाने व त्यांच्या नेमलेल्या कृषी साहाय्यकाने या गोष्टीकडे जातीने लक्ष घालण्याची गरज असून, यंदा कृषी दुकानातील सर्व बी-बियाणांची उगम क्षमता तपासणी करणे करजेचे आहे.
- गणेश पाटील, खैरवे, ता. शहादा