ईटीआय मशीनच मिळत नसल्याने वाहकांकडून पुन्हा होऊ लागली पंचिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:36 IST2021-03-01T04:36:18+5:302021-03-01T04:36:18+5:30
नंदुरबार आगारात २२७, शहादा २४०, नवापूर १८५ तर अक्कलकुवा आगारात २०० वाहक कामकाज करतात. या वाहकांकडून दिवसभरात जिल्ह्यातील बसेसचा ...

ईटीआय मशीनच मिळत नसल्याने वाहकांकडून पुन्हा होऊ लागली पंचिंग
नंदुरबार आगारात २२७, शहादा २४०, नवापूर १८५ तर अक्कलकुवा आगारात २०० वाहक कामकाज करतात. या वाहकांकडून दिवसभरात जिल्ह्यातील बसेसचा ८० हजार किलोमीटरपर्यंत प्रवास करून आणला जातो. जिल्ह्यातील साधारण ५० हजार प्रवासी या बसेसमधून प्रवास करतात. यातून जिल्ह्याचे एसटीचे उत्पन्न हे साधारण ३५ लाखांच्या घरात आहे. हे उत्पन्न प्राप्त करण्यासाठी मेहनत करणाऱ्या वाहकांना सध्या ईटीआय मशीन त्रस्त करत असल्याचे केलेल्या पडताळणी दरम्यान दिसून आले. नंदुरबार आगारातील काही वाहकांसोबत संवाद साधला असता, त्यांनी सांगितले की, मशीनमध्ये तिकीट अडकल्यास ते बाहेर काढण्यात बराच वेळ जातो. काहींना तर मशीनच मिळत नसल्याने तिकीट पंच करून द्यावे लागते. जिल्ह्यातील चारही आगारात महामंडळाने दिलेले मशीनच खराब झाल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे.
नंदुरबार आगारातून दररोज ४८१ बस फेऱ्या करण्यात येतात. या बस फेऱ्यात ग्रामीण भागातील बसेसमध्ये १०० टक्के पंच करून तिकीट वाटप होत आहे. केवळ लांब पल्ल्याच्या बसेससाठी तिकीट मशीन दिले जात आहे. यातही तिकीट अडकल्यानंतर ते बाहेर काढण्यासाठी मेहनत करावी लागत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
चारही आगारातून दररोज तक्रारींचा पाढा वाचला जात असल्याचे तेथील वाहतूक नियंत्रकांकडून सांगण्यात आले. यात प्रामुख्याने बॅटरी खराब होणे, तिकीट अडकणे, मशीन हँग होणे यासह विविध प्रकार होत आहेत. यातून मग मशीन बदलून देण्याऐवजी पंचिंग करून देण्याच्या सूचना करण्यात येत आहेत.
बॅटरी व मशीन हँग होण्याच्या तक्रारी ह्या गेल्या अनेक दिवसांपासून होत्या. महामंडळाकडून पर्यायी ईटीआय मशीनही उपलब्ध नसल्याने समस्या दिवसेंदिवस वाढून मॅन्यूअली तिकीट वाटप करण्याची वेळ वाहकांवर आली आहे.
एसटी कामगारांकडून पाठपुरावा सुरू
दरम्यान या समस्येबाबत एसटीच्या कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसाेबत संपर्क केला असता, तो होऊ शकला नाही. परंतु काही वाहकांनी सांगितले की, कामगार संघटना ईटीआय मशीनबाबत शासनासोबत चर्चा करत आहेत. त्यांच्याकडून लवकरच चांगल्या दर्जाचे मशीन मिळतील, अशी अपेक्षा आहे. यासाठी संघटनांकडून पाठपुरावाही सुरू आहे.
मशीनअभावी तिकीट काढणे वाहकांनाच अडचणीचे ठरत असून त्यांना कॅश कलेक्शनला समस्या येत असल्याचे सांगण्यात आले.
शहरी भागात गाडी घेऊन गेलो असताना, अचानक मशीन खराब झाले. परतीच्या प्रवासात तिकीट कसे काढून द्यावे ही अवस्था होती. शेवटी पर्याय म्हणून तिकिटे पंच करून देण्यास सुरुवात केली. इतरांसोबतही असे अनेक प्रकार घडले आहेत.
-वाहक, नंदुरबार आगार,
ग्रामीण भागात होणाऱ्या बस फेऱ्यांसाठी आता पंच केलेली तिकिटे देत आहे. मशीन खराब झाल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांनुसार कामकाज सुरू आहे. नवे मशीन आल्यावर त्यानुसार कामकाज करू.
-वाहक, नंदुरबार आगार.
गेल्या काही दिवसांपासून ईटीआय मशीनबाबत समस्या जाणवत आहेत. यातून मग वाहकांना सूचना केल्या आहेत. जुन्या पद्धतीने तिकीट वाटप करण्याचे कामकाज सुरू आहे. नंदुरबार जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात ही स्थिती आहे. महामंडळाच्या सूचनांनुसार हे कामकाज सुरू आहे. येत्या काळात आगारांना नवीन मशीन देण्यात येतील, अशी शक्यता आहे. याबाबत शासनाकडून अद्याप अधिकृत अशी कोणतीही माहिती मिळालेली नाही.
-मनोज खैरनार,
व्यवस्थापक, नंदुरबार आगार