‘नरेगा’अंतर्गत कामे उपलब्ध करून द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 12:11 IST2018-04-15T12:11:42+5:302018-04-15T12:11:42+5:30
तहसीलदारांना निवेदन : गव्हाणीपाडा येथील मजुरांवर उपासमारीची वेळ

‘नरेगा’अंतर्गत कामे उपलब्ध करून द्यावी
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 15 : तालुक्यातील लोभाणी ग्रामपंचायतीकडे शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत कामे मागूनही अजूनपावेतो कामे मिळालेली नाहीत. त्यामुळे गव्हाणीपाडा येथील बेरोजगार मजुरांनी कामांसाठी शुक्रवारी तहसीलदार योगेश चंद्रे यांना साकडे घातले. तातडीने कामे उपलब्ध करून द्यावीत अन्यथा नियमानुसार बेरोजगार भत्ता मिळावा, अशी मागणी केली.
तळोदा तालुक्यातील गव्हाणीपाडा हे शंभर टक्के आदिवासी वस्ती असलेले गाव लोभाणी ग्रुपग्रामपंचायतीअंतर्गत येते. गव्हाणीपाडा येथील 41 मजुरांनी 22 जानेवारी 2016 रोजी राज्य शासनाच्या सामाजिक अंकेक्षण प्रक्रियेदरम्यान महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अर्थात नरेगातून विशेष ग्रामसभेत ग्रामपंचायतीकडे कामे उपलब्ध करुन देण्याची मागणी केली होती. परंतु अजूनपावेतो कामे मिळाली नाहीत. त्यामुळे आम्ही बेरोजगार असून रोजगाराचा प्रश्न आमच्यापुढे कायम आहे. साहजिकच उपासमारी निर्माण झाली आहे. रोजगारासाठी संबंधितांकडे सातत्याने पाठपुरावा केला. मात्र गांभीर्याने लक्ष देण्यात आलेले नाही, असेही या मजुरांचे म्हणणे आहे. संबंधित ग्रामपंचायतीने विहीत कालावधीत काम न देणे, बेरोजगार भत्तासाठीचा अर्ज नाकारणे याबाबत चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी सुभाष नाईक, सायसिंग नाईक, चंदू वळवी, रामा वळवी, उमेश वळवी, भगतसिंग वळवी, रवींद्र पाडवी, जालमसिंग पाडवी, कैलास पाडवी, अशोक पाडवी, जितेंद्र पाडवी, रोहिदास नुराजी पाडवी, रायसिंग नाईक, तातू नाईक, लेखूबाई नाईक, दुर्गा पाडवी, अंबूबाई पाडवी, झगूबाई पाडवी, वसंत नाईक, दिलीप नाईक, देवीसिंग नाईक, सुरेश वंजी पाडवी, नीलिमा पाडवी, हिरासिंग पाडवी, मदन नाईक, लक्ष्मण गावीत, किशन पाडवी, जयवंत पाडवी, उत्तम पाडवी, गिरीधर पाडवी, विलास पाडवी आदी 41 मजुरांनी मागणी केली आहे.