रस्ता सुरक्षा नियमांची शाळांमध्ये माहिती देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 14:19 IST2021-01-21T14:18:47+5:302021-01-21T14:19:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : महिन्यातील एक दिवस जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयातून वाहतूक नियमांविषयी जनजागृती करण्यात यावी आणि विद्यार्थ्यांना रस्ता ...

रस्ता सुरक्षा नियमांची शाळांमध्ये माहिती देणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : महिन्यातील एक दिवस जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयातून वाहतूक नियमांविषयी जनजागृती करण्यात यावी आणि विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षाविषयक माहिती देण्यात यावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ३२ व्या रस्ता सुरक्षा अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाला जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, कार्यकारी अभियंता योगेश कुलकर्णी, शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नानासाहेब बच्छाव, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक के.डी. सातपुते, सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव उपस्थित होते. डॉ. भारुड म्हणाले, रस्त्यांवरील अपघात कमी करण्यासाठी कायद्यासोबत नागरिकांना नियमांचे पालन करण्याची सवय असणेदेखील महत्त्वाचे आहे. त्यासाठी शिस्तपालन करणारी पिढी घडविण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे. नागरिकांनी वाहतूक नियमांविषयी जाणून घ्यावे आणि अपघात कमी करण्यासाठी सहकार्य करावे. सोबतच वेगवान वाहनांवर प्रादेशिक परिवहन विभागाने कडक कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी दिले.
बच्छाव यांनी सादरीकरणाद्वारे वाहतूक नियमांची माहिती दिली. वाहनांची वाढती संख्या, व्यसन घेऊन वाहन चालविणे, युवकांचा अतिउत्साह, वाहनांची दुरुस्ती वेळेत न करणे, खराब हवामान, वाहतुकीचे अयोग्य नियोजन यामुळे अपघात होतात. अपघात टाळण्यासाठी चार ‘ई’ अर्थात कायद्याची अंमलबजावणी, शिक्षण, अभियांत्रिकी आणि तात्काळ आरोग्य सुविधा महत्त्वाच्या आहेत, असे त्यांनी सांगितले.