२४ तास वीजपुरवठा द्या, अन्यथा उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 12:57 IST2020-07-31T12:57:43+5:302020-07-31T12:57:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क असलोद : शहादा तालुक्यातील असलोद येथे नळ पाणीपुरवठ्यासाठी स्वतंत्र कूपनलिका व विहिरी असून त्यासाठी २४ तास ...

२४ तास वीजपुरवठा द्या, अन्यथा उपोषण
लोकमत न्यूज नेटवर्क
असलोद : शहादा तालुक्यातील असलोद येथे नळ पाणीपुरवठ्यासाठी स्वतंत्र कूपनलिका व विहिरी असून त्यासाठी २४ तास वीजपुरवठा होत नसल्याने ग्रामस्थांना कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. वीज वितरण कंपनीने नळपाणीपुरवठा योजनेसाठी तात्काळ २४ तास वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा अन्यथा उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
असलोद येथे नळपाणीपुरवठा योजनेसाठी गावापासून एक किलोमीटर अंतरावर कूपनलिका व विहीर असून त्याला २४ तास वीजपुरवठा मिळत नसल्याने गावात पाणीपुरवठा व्यवस्था कोलमडली आहे. विहीर व कूपनलिकेला मुबलक पाणीसाठा असूनदेखील पाण्यासाठी ग्रामस्थांचे हाल होत आहेत. रात्री-बेरात्री पाण्यासाठी भटकंती केली जाते. ग्रामपंचायत व प्रशासनाने अनेकवेळा वीज वितरण कंपनीला याबाबत कळविले असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. येत्या ४ आॅगस्टपर्यंत नवीन विद्युत रोहित्र बसवून २४ तास वीजपुरवठा करून गावाला पाणीपुरवठा सुरळीत व्हावा नाही तर संबंधित वीज कंपनीच्या कार्यालयासमोर ग्रामस्थ उपोषण करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. हे निवेदन वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता, पंचायत समिती व तहसीलदार यांना देण्यात आले आहे. निवेदनावर राजेश कदम, अजय सोनवणे, वेडू पाटील, दिलवर गिरासे, राकेश थोरात आदी ३० जणांच्या सह्या आहेत.
ऐन पावसाळ्यात ग्रामस्थांची
पाण्यासाठी भटकंती
असलोद येथे पाणीपुरवठा करण्यासाठी असलेल्या विहिरीला मुबलक पाणी आहे. मात्र या पाणीपुरवठा योजनेला पुरेसा वीजपुरवठा होत नसल्याने ग्रामस्थांना ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सध्या शेतीकामे सुरू असल्याने मजुरांना रोजगार बुडवून पाण्याच्या शोधासाठी फिरावे लागत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.