सारंगखेड्यात निषेध मोर्चा, तुरळक दगडफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2020 11:57 IST2020-10-26T11:56:39+5:302020-10-26T11:57:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सारंगखेडा येथील अल्पवयीन मुलीच्या खुनाच्या घटनेच्या निषेधार्थ आदिवासी संघटना, एकलव्य दल, एकलव्य आदिवासी क्रांती ...

सारंगखेड्यात निषेध मोर्चा, तुरळक दगडफेक
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सारंगखेडा येथील अल्पवयीन मुलीच्या खुनाच्या घटनेच्या निषेधार्थ आदिवासी संघटना, एकलव्य दल, एकलव्य आदिवासी क्रांती दल, अखिल भारतीय युवा कोळी समाज संघटनासह विविध संघटनांच्या वतीने सारंगखेडा येथील संशयीताच्या घरावर आणि पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. आरोपीला तात्काळ फाशी द्यावी अशी मागणी यावेळी मोर्चेकऱ्यांतर्फे करण्यात आली. सारंगखेड्यात प्रथमच एवढ्या भव्य प्रमाणात निषेध मोर्चा काढण्यात आला.
दरम्यान, मोर्चा दरम्यान तुरळक दगडफेक झाली. तर आरोपीच्या घराची तोडफोड करण्यात आली. मोर्चामधील गर्दीचा अंदाज पोलिसांचा चुकला. त्यामुळे नियंत्रण ठेवण्यात मोठी तारांबळ उडाल्याचे चित्र दिसून आले.
मोर्चाची सुरुवात सारंखेडा पुलापासून मुख्य बाजारपेठ मार्गे पीडितेच्या घरापर्यंत जाऊन तेथून सारंखेडा पोलीस स्टेशनच्या आवारात पोलीस निरीक्षकांना विविध संघटनेच्यावतीने निवेदन देण्यात आले. दरम्यान पीडिताच्या कुटुंबाची नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी भेट घेतली. त्याचबरोबर रॅलीतील जमावं आरोपीच्या घराची घरातील संसारोपयोगी साहित्याची नासधूस केल्याचीही त्यांनी पाहणी केली. यावेळी प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलीस अधीक्षक एम. रमेश कदम, अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, पोलीस निरीक्षक गजानन पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर नवले, सारंखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे आदी उपस्थित होते.
आरोपीला काही तासातच मुसक्या आवळण्यात पोलीसांना यश आले होते. परंतु विविध संघटनांनी आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली. मोर्चा निघणार असल्याची कुणकूण पोलिसांना शुक्रवारीच लागली होती. त्यानुसार पोलिसांनी ठिकठिकाणी बंदोबस्त देखील लावला होता. शिवाय जनतेला अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन देखील केले होते. मोर्चेकऱ्यांच्या वतीने पोलिसांना निवेदन देण्यात आले. सध्या गावात तणावपूर्ण शांतता असून चौकाचौकात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.
दरम्यान, शुक्रवारी रात्री अकरा वाजता पीडितेवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. रॅलीच्या पुढे ऐका गाडीवर पीडित मुलीच्या फोटो लावून भावपूर्ण श्रद्धांजली चे बॅनर लावले होते. दरम्यान, जमावाकडून रॅली दरम्यान काही दुकानांवर दगड फेक करून तसेच आरोपीताच्या घराचीही तोडफोड करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत जमावाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम पोलीस स्टेशनला सुरू होते.