सौर उर्जेचा प्रस्ताव धूळखात पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 12:37 IST2020-10-15T12:37:11+5:302020-10-15T12:37:49+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दोन हजार अंगणवाड्यांना वीज पुरवठा नसल्याने त्या ठिकाणी सौर उर्जेचा पर्याय देण्यात आला होता. ...

The proposal for solar energy fell to dust | सौर उर्जेचा प्रस्ताव धूळखात पडून

सौर उर्जेचा प्रस्ताव धूळखात पडून

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : दोन हजार अंगणवाड्यांना वीज पुरवठा नसल्याने त्या ठिकाणी सौर उर्जेचा पर्याय देण्यात आला होता. परंतु दोन वर्षांपासून हा प्रस्ताव रखडला असून विजेअभावी अंगणवाड्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, अशीच स्थिती जिल्हा परिषदेच्या जवळपास साडेतीनशे शाळांची देखील आहे.  
चार वर्षांपूर्वी तत्कालीन उर्जामंत्री  यांनी नंदुरबारात आढावा बैठक घेतली होती. त्यावेळी बैठकीत अंगणवाडींना वीज पुरवठा करण्याचा प्रश्न प्राधान्यक्रमाने पुढे आला होता. परंतु अनेक अंगणवाड्या या दुर्गम भागात,  डोंगराळ भागात चालतात. अशा ठिकाणी वीज पुरवठा शक्य नसल्यास सौर उर्जेद्वारा अशा अंगणवाडींना वीज पुरवठा करावा असे ठरले होते. त्यानुसार तत्कालीन उर्जामंत्र्यांनी तसे आदेशही दिले होते. परंतु मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा परिषदेकडूनच तसा प्रस्ताव गेला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जवळपास दोन हजार अंगणवाड्या अंधाराचा सामना करीत आहेत. 
जिल्ह्यात दोन हजार ४३४ अंगणवाडी आहेत. त्यापैकी काही अंगणवाडींना वीज पुरवठा केला जातो. काहींनी तो घेतला देखील आहे. चार वर्षापूर्वी  १७ अंगणवाड्यांनी वीज पुरवठ्यासाठी कोटेशन भरलेले होते.  सद्य स्थितीत जवळपास दोन हजार अंगणवाडींना वीज पुरवठा करण्यासाठी पाऊले उचलण्यात आली आहेत. या अंगणवाडींना सौर उर्जेवर आधारीत वीज पुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी डीपीआर तयार करण्यात आला होता. परंतु नंतर त्यावर काहीच कार्यवाही झाली नाही. 
विविध कामे रखडतात
अंगणवाड्यांना सध्या अमृत आहार योजना, कुपोषीत बालकांची काळजी, त्यांची नोंदणी, वेळोवेळी वजन घेणे, पोषण आहार योजना यासह इतर विविध योजनांसाठी काम करावे लागते. ही बाब लक्षात घेता अंगणवाडींचा सर्व रेकॉर्ड ठेवण्यासाठी त्यांना संगणक पुरवठा करणे आणि त्या अनुषंगाने वीज जोडणी देणे आवश्यक आहे. परंतु अंगणवाडींकडे एवढा व्याप असतांनाही संगणकही दिले गेले नाहीत किंवा वीज जोडणी देखील अद्यापपर्यंत दिली गेली नाही. आता सौर उर्जेद्वारे वीज पुरवठा झाल्यानंतर किमान संगणक तरी भेटतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. अंगणवाडी संघटनेने गेल्या अनेक वर्षांपासून वीज जोडणीची मागणी केलेली आहे.
शाळांचीही तीच गत
नंदुरबार जिल्हा परिषदेअंतर्गत जिल्ह्यात एकुण एक हजार ३९३ शाळा चालविल्या जातात. यापैकी एक हजार ५३ शाळांना वीज पुरवठा जोडणी देण्यात आलेली आहे. परंतु त्यातही अनेक शाळांची वीज थकबाकी किंवा इतर कारणांनी वीज पुरवठा खंडित झालेला आहे. पुन्हा नव्याने त्यांना वीज जोडणी मिळू शकलेली नाही. अशा शाळांची संख्या देखील १०० पेक्षा अधीक आहे. त्यामुळे वीज नसलेल्या अशा एकुण जवळपास साडेचारशे शाळा असण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शासनाच्या धोरणानुसार प्रत्येक शाळेला वीज जोडणी आवश्यक आहे. त्याआधारे संगणकावरील कामकाज, विद्यार्थ्यांना संगणकाचे शिक्षण देणे, विविध प्रयोगांसाठी देखील वीज आवश्यक असते.

वीज न पोहचलेल्या गाव व पाड्यांची अडचण...
वीज जोडणी नसलेल्या सर्वाधिक शाळा या दुर्गम भागातील आहेत.  अशा शाळांच्या गावाच्या ठिकाणीच वीज पोहचलेली नाही तेथे शाळेला  कुठून वीज मिळेल असा प्रश्न आहे. धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील सर्वाधिक शाळा आहेत. या दोन्ही तालुक्यातील ३०० तर इतर तालुक्यातील    ४० शाळांचा समावेश आहे. सध्या शासनाचा सौर उर्जेवर सर्वाधिक भर     आहे. अनेक गाव व पाड्यांवर सौर दिवे, पथदिवे, सौर पंप पुरविण्यात आले आहेत. त्यामुळे अंगणवाड्यांनाही सौर उर्जाद्वारे वीज पुरवठा झाल्यास   कर्मचार्यांना संगणकावर अनेक कामे करता येणार आहे. सध्या अंगणवाडी कर्मचारी आणि मदतनिस यांच्यावर नियमित कामांपेक्षा इतर कामांचाही       बोजा वाढला आहे. शिवाय दैनंदिन रिपोर्ट मोबाईल किंवा टॅबद्वारे वरिष्ठांना पाठविण्याची सक्ती आहे. त्यामुळे अडचणी येतात. 

Web Title: The proposal for solar energy fell to dust

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.