ऑक्सिजनयुक्त कोविड कक्षासाठी प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:31 IST2021-04-07T04:31:10+5:302021-04-07T04:31:10+5:30
दिवसेंदिवस कोरोना महामारीने प्रचंड संसर्ग पसरवला आहे. साहजिकच यामुळे ग्रामीण भागातदेखील रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. त्यातही गंभीर रुग्णांची समस्या ...

ऑक्सिजनयुक्त कोविड कक्षासाठी प्रस्ताव
दिवसेंदिवस कोरोना महामारीने प्रचंड संसर्ग पसरवला आहे. साहजिकच यामुळे ग्रामीण भागातदेखील रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. त्यातही गंभीर रुग्णांची समस्या अधिक बिकट झाली आहे. तालुक्यातील मोठ्या प्रमाणात रुग्ण नंदुरबार, शहादा, बारडोली, सुरत येथे उपचारासाठी जात आहेत. त्या रुग्णालयांचा महागडा खर्च असताना तेथेही बेड उपलब्ध होत नसल्याची स्थिती आहे. साहजिकच तळोदा शहरात ऑक्सिजनचे सुसज्ज कोरोना कक्ष उभारण्यात यावा, अशी जनतेची मागणी आहे. यासंदर्भात ‘लोकमत’नेही हा प्रश्न सातत्याने लावून धरला होता. या पार्श्वभूमीवर येथील महसूल प्रशासनाने ३० बेडचे कोविड कक्ष उभारण्याचे नियोजन केले आहे. यासाठी येथील हातोडा रस्त्यावरील पशुसंवर्धन विभागाचे लघुपशुचिकित्सालयाच्या इमारतीची निवड करण्यात आली आहे. तसा प्रस्तावदेखील गेल्या शनिवारी पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी यांना पाठवण्यात आला आहे. आता जिल्हा प्रशासनाने यावर तातडीने कार्यवाही करून हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
दरम्यान, या इमारतीची पाहणी आमदार राजेश पाडवी यांनी तहसीलदार गिरीश वखारे, तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ.महेंद्र चव्हाण, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डाॅ.विजय पाटील व बांधकाम विभागाचे अधीक्षक भदाणे यांच्यासह भेट देऊन पाहणी केली. यावेळी रुग्णांना सुविधा देण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याची सूचना आमदार पाडवी यांनी संबंधितांना दिली आहे. कोरोना महामारीच्या दृष्टीने प्रशासनाने ऑक्सिजन बेडसाठी तत्काळ पावले उचलल्याने समाधान व्यक्त केले आहे.
सुविधांबाबत बांधकाम विभागाला पत्र
ऑक्सिजनयुक्त कोविड कक्षासाठी प्रशासनाने पशुसंवर्धन विभागाची शहरातील प्रशस्त इमारतीची जागा फिक्स केली असली तरी तेथे इलेक्ट्रिक फिटिंग, पंखे, पाण्याची व्यवस्था अशा वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध नसल्याचे महसूल प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे या सुविधांना प्राधान्य देण्याची मागणी बांधकाम विभागाने सूचित केले आहे. तसे पत्रदेखील या विभागाच्या शहादा येथील कार्यालयास दिले आहे. त्यामुळे आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासनाने संवेदनशील बनून तातडीने तेथे सुविधांसाठी प्रयत्न करावे, अशी मागणी आहे.
शहरातील पशुचिकित्सालयाच्या इमारतीत ३० ऑक्सिजन बेडसाठी नियोजन आहे. तेथे वीज व पाण्याची सुविधा उपलब्ध होण्यासाठी संबंधितांना सूचित केले आहे. त्यामुळे लवकरच हे कक्ष उभे राहील.
-गिरीश वखारे, तहसीलदार, तळोदा