आश्वासने हवेतच, नेत्यांनाही पडला विसर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 12:26 IST2020-09-21T12:26:24+5:302020-09-21T12:26:31+5:30
रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नंदुरबार जिल्हा निर्मिती व त्यापूर्वीच्या काळात अर्थात गेल्या तीन दशकात परिसराच्या ...

आश्वासने हवेतच, नेत्यांनाही पडला विसर !
रमाकांत पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नंदुरबार जिल्हा निर्मिती व त्यापूर्वीच्या काळात अर्थात गेल्या तीन दशकात परिसराच्या विकासासाठी अनेक नव्या प्रकल्पांची घोषणा नेत्यांनी केली असली तरी या तीन दशकात त्या योजना मात्र प्रत्यक्षात आकारास आलेल्या नाहीत. गंमतीची बाब म्हणजे या घोषणा आता नेत्यांच्या राजकीय अजेंड्यावरुनही गायब झाल्या आहेत. सोमवारी जागतिक विसरभोळे दिवस साजरा होत असताना या घोषणांची मात्र प्रकर्षाने जनतेला आठवण येत आहे.
नंदुरबार स्वतंत्र जिल्हा व्हावा यासाठी जिल्हा निर्मितीची मागणी ७० च्या दशकात सुरू झाली. प्रत्यक्षात मात्र जिल्हा निर्मितीचे स्वप्न १९९८ ला साकार झाले. पण जिल्हा निर्मितीच्या विषयामुळे परिसरातील विकासातील अनेक प्रश्न चर्चेत आले. जिल्हा निर्मितीची मागणी होत असतानाच या नव्या जिल्ह्यात मोलगी आणि म्हसावद हे दोन स्वतंत्र तालुके व्हावेत ही मागणी होती. १९९३ मध्ये स्व.गोपीनाथ मुंडे हे विरोधी पक्षनेते असताना नंदुरबार जिल्ह्यातील त्यांच्या सभांमध्ये हा विषय त्यांनी आवर्जून चर्चेत आणला होता. त्यानंतरही विधानसभा निवडणूक व लोकसभा निवडणुकीच्यावेळी सर्वच राजकीय पक्षांच्या अजेंड्यावर हा विषय होता. नंदुरबार जिल्हा निर्मितीची मुहूर्तमेढ होत असताना त्यावेळी देखील यासंदर्भातील आश्वासने देण्यात आली. एवढेच नव्हे तर पिंपळखुटा, ता.अक्कलकुवा येथे तत्कालिन राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनीदेखील यासंदर्भातील आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात मात्र गेल्यावर्षी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत हा विषयच चर्चेला आला नाही. किंबहुना त्याबाबतची चर्चाही आता थांबल्यासारखीच आहे.
सातपुड्यातील वन्यजीव रक्षणासाठी ९० च्या दशकात वनविभागाने तोरणमाळ अभयारण्याचा प्रस्ताव तयार केला होता. या प्रस्तावाचे निमित्तही तेवढेच मोठे होते. कारण तोरणमाळला लागूनच मध्य प्रदेश शासनानेही नवीन अभयारण्याचा प्रस्ताव तयार केले होते. ते एकत्रित करून आशिया खंडातील सर्वात मोठे राष्टÑीय उद्यान साकारण्याचे हे स्वप्न होते. त्या काळातील दोन लोकसभा निवडणुकीत हा प्रश्न सर्वच राजकीय पक्षांच्या अजेंड्यावर आला. आता मात्र त्याचा सर्वांनाच विसर पडला आहे. असाच एक सोलापूर-अहमदाबाद राष्टÑीय महामार्गाचा प्रश्नाची आठवण आता कुणालाही नाही. गेल्या चार वर्षात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अनेक नवीन राष्टÑीयमहामार्ग घोषित केले. जिल्ह्यातील रस्त्यांचाही विस्तार व नवीन महामार्गाची घोषणा केली पण सातपुड्याच्या विकासाला चालना देणारा सोलापूर-अहमदाबाद राष्टÑीय महामार्ग मात्र दुर्लक्षित राहिला.
नंदुरबारला औद्योगिक वसाहतीची घोषणा जिल्हा निर्मितीपूर्वी झाली. त्याचे दोनवेळा तत्कालिन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. अखेर आता तिसऱ्यांदा जागा बदलून काम सुरू आहे. ही औद्योगिक वसाहत होण्यापूर्वीच येथे चिलीपार्क उभारण्याची घोषणा होती. आता जिल्ह्यातील मिरचीचे अस्तित्वच धोक्यात येत असताना चिलीपार्क कालबाह्य झाला. त्यानंतर डायमंड पार्कची घोषणा झाली. पण सुरतचा हिरा उद्योग संकटात आल्यानंतर ती घोषणाही बाजूला पडली.
एकूणच जिल्ह्याच्या विकासासंदर्भातील अनेक योजना, अनेक घोषणा गेल्या तीन-साडेतीन दशकात झाल्या. काही अजूनही चर्चेत तग धरुन आहेत तर काही मात्र काळाच्या पडद्याआडच विस्मृतीला जात आहेत. जागतिक विसरभोळे दिनानिमित्त नव्याने हे प्रस्तावित प्रकल्प नेत्यांच्या स्मृतीत यावेत, अशी अपेक्षा जिल्हावासी व्यक्त करीत आहेत.