वाळू घाट लिलाव लांबल्याने तस्करीसह भावही वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 11:48 IST2020-01-21T11:45:31+5:302020-01-21T11:48:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील वाळू घाट लिलावाबाबत जिल्हा प्रशासनाने भिजत घोंगडे ठेवल्याने गुजरातमधून वाळू तस्करीला जोर आला ...

वाळू घाट लिलाव लांबल्याने तस्करीसह भावही वाढले
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील वाळू घाट लिलावाबाबत जिल्हा प्रशासनाने भिजत घोंगडे ठेवल्याने गुजरातमधून वाळू तस्करीला जोर आला आहे. जुन्या पावत्यांवरून जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर वाळू वाहतूक होत आहे. दिवसाला किमान ४० ते ५० मोठी वाहने नंदुरबारातून जात असल्याचे चित्र आहे. याशिवाय चोरट्या मार्गाने देखील अनेक ठिकाणाहून अवैध वाळू उपसा सुरू आहेच. दरम्यान, वाळू ठेकेदारांमधील
जिल्ह्यात यंदा वाळू घाट लिलावाबाबत उदासिनता दिसून येत आहे. दरवर्षी जानेवारी महिन्यात वाळू घाट लिलावाची प्रक्रिया सुरू होत असते. यंदा मात्र, प्राथमिक टप्प्यावर देखील ही प्रक्रिया सुरू करण्यात आली नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गुजरातमधील वाळू ठेकेदारांचे फावले असून जिल्ह्यात अवैध मार्गाने त्याची वाहतूक केली जात असल्याचे चित्र आहे.
लिलाव प्रक्रिया लांबली
यंदा वाळू ठेके देण्याची प्रक्रिया लांबली आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात तीन ठिकाणी उपसा करण्यासाठी ठेके देण्यात आले होते. यावर्षी देखील किमान तीन ते चार ठिकाणी ठेके दिले जातील असा अंदाज आहे. त्यादृष्टीने प्रक्रिया राबविण्यात येत असली तरी ती अतीशय संथ गतीने सुरू आहे. वास्तविक डिसेंबर महिन्यात प्रक्रिया पुर्ण होऊन जानेवारी महिन्यापासून वाळू उपसा करण्यास परवाणगी दिली जात असते. यावर्षी तर जानेवारी निम्मे संपला तरी अद्याप प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलेली नाही.
गुजरात हद्दीत उपसा
जिल्ह्याच्या सिमेलगत गुजरात हद्दीतील तापी नदीतून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा केला जातो. परिसरात मोठ्या प्रमाणावर वाळूचे डेपो आहेत. तेथून वाळू भरून वाहने नंदुरबार जिल्ह्यातून रवाना होतात. थेट नाशिक, मालेगाव, धुळे येथे ही वाळू पोहचविली जाते. एकाच वेळी ३० ते ४० वाहने निघतात. दिवसातून ४० ते ५० अवजड वाहने भरून वाळू वाहतूक केली जात असते. या वाहतुकीवर कुणाचेही नियंत्रण नसल्याचे चित्र आहे.
भाव वाढविले
जिल्ह्यात वाळू उपसा नसल्यामुळे गुजरातमधील वाळू ठेकेदारांनी जिल्ह्यातील वाळू व्यावसायिकांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. परिणामी वाळूचे भाव वाढविले जात आहे. वास्तविक परजिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असतांना जिल्ह्यात मात्र संबधितांकडूनन अडवणुकीचे धोरण अवलंबले जात आहे. त्यामुळे स्थानिक स्तरावर वाळू ठेके दिल्यास गुजरातमधील ठेकेदारांची मोनोपॉली कमी होण्यास मदत होणार आहे.
वाहनांवर कारवाईकडे दुर्लक्ष
वाळू भरून जाणाऱ्या अवजड वाहनांकडे आरटीओ, पोलीस विभागाचे दुर्लक्ष होत आहे. सकाळी पाच वाजेपासून आठ वाजेपर्यंत ही वाहने नंदुरबारच्या हद्दीतून पास होतात. क्षमतेपेक्षा जास्त भार असल्यामुळे रस्त्यांची वाट लागतेच शिवाय अपघात देखील होत आहेत.
शहरातील वळण रस्त्यांवर या वाहनांनी नंदुरबारकरांना हैराण केले आहे. अनेकांचा जीव देखील या वाहनांनी घेतला असल्यामुळे कारवाईचा बडगा उचलावा अशी मागणी शहरवासीयांकडून केली जात आहे.
तापीच्या वाळूला राज्यभर मागणी आहे. विशेषत: नाशिक, पुणे, मुंबई भागात ही वाळू मोठ्या प्रमाणावर विक्री होते. परिणामी वाळू तस्करी मोठ्या प्रमाणावर होते. नंदुरबारातील वाळू तस्करीचे प्रकरण आणि दाखल झालेले गुन्हे तर सर्वज्ञात आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील तापी नदीतील वाळू ठेके मिळविण्यासाठी स्पर्धा लागते. कोट्यावधींमध्ये हे ठेके विकले जात असतात.
तापी नदीवर एकुण १४ ठिकाणी वाळू घाट आहेत. परंतु सर्वच ठिकाणचे लिलाव केले जात नाहीत. काही ठिकाणी ग्रामस्थांचा विरोध तर काही ठिकाणी पर्यावरणाची आडकाठी असते. त्यामुळे दोन किंवा तीन ठिकाणच्या घाटाचेच लिलाव केले जात असतात. यंदा देखील तीच संख्या कायम राहणार आहे.