शहादा तालुक्यातील प्रकल्प तहानलेलेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:34 IST2021-09-05T04:34:06+5:302021-09-05T04:34:06+5:30
ब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील सिंचन प्रकल्पामध्ये अत्यल्प जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे मोठी चिंतेची बाब निर्माण झाली आहे. सातपुडा पर्वतरांगेत ...

शहादा तालुक्यातील प्रकल्प तहानलेलेच
ब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील सिंचन प्रकल्पामध्ये अत्यल्प जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे मोठी चिंतेची बाब निर्माण झाली आहे. सातपुडा पर्वतरांगेत असलेल्या दरा धरणात केवळ ३० टक्केच जलसाठा शिल्लक राहिला आहे, अशीच परिस्थिती राहिल्यास धरण कोरडे होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
वाकी नदीवर उनपदेव पर्यटनस्थळाच्या वरील बाजूस दरा धरण बांधण्यात आलेले आहे. वाकी नदीला गेल्या सात ते आठ वर्षांपूर्वी बारमाही पाणी राहत असे, सध्या मात्र तीन-चार वर्षांपासून हिवाळ्यातच ही नदी कोरडी होते. सातपुडा पर्वतरांगेत धरण असल्याने पावसाळ्यात चांगला पाऊस पडतो. नैसर्गिक परिस्थिती बघता परिसराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे धरण आहे. ज्याच्यामुळे परिसरात पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास मदत होते. पावसाळ्यात वाकी नदीला मोठा पूर येतो. मात्र, या वर्षी पावसाळा हा अत्यल्प स्वरूपाच्या असल्याने धरण पूर्ण क्षमतेने अद्यापपर्यंत भरलेच नाही. गेल्या एक महिन्यापासून पावसाने पाठ फिरविल्याने धरण कोरडे होण्याच्या मार्गावर आहे. दिवसेंदिवस पाण्याच्या पातळीत घट होत चालली आहे. जोरदार पाऊस झाल्याशिवाय धरण भरणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.
अशीच परिस्थिती तालुक्यातील राणीपूर, सुसरी, दूधखेडा, काकरदा, चिरखाण धरणांची झालेली आहे. या सर्व सिंचन प्रकल्पांची पाण्याची पातळी कमी झाली आहे. जलसाठा कमी होत चालल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. सुसरी प्रकल्पाच्या क्षेत्रात १९ गावे सिंचनाखाली येतात. त्यामुळे भविष्यात शेतांमधील बोर कोरडे होतील म्हणून येत्या आठ दिवसांच्या आत नदी-नाल्यांना पूर न आल्यास भीषण दुष्काळाच्या व पाणीटंचाईच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
सुसरी प्रकल्पात अल्प जलसाठा
सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यांतून वाहून येणाऱ्या सुसरी नदीवर धरण बांधण्यात आले आहे. परंतु अल्प प्रमाणात नदीला पूर येत असल्याने सुसरी धरणातदेखील अल्प जलसाठा असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.