शादी डॉट कॉमवरील प्रोफाईल महिलेला पडली महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 12:25 IST2020-05-16T12:25:46+5:302020-05-16T12:25:57+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शादी डॉट कॉमवर टाकलेले प्रोफाईल कळंबू येथील एका महिलेला चांगलेच महागात पडले. लग्नाचा प्रस्ताव ...

The profile on Shaadi.com cost the woman dearly | शादी डॉट कॉमवरील प्रोफाईल महिलेला पडली महागात

शादी डॉट कॉमवरील प्रोफाईल महिलेला पडली महागात


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शादी डॉट कॉमवर टाकलेले प्रोफाईल कळंबू येथील एका महिलेला चांगलेच महागात पडले. लग्नाचा प्रस्ताव देत अमेरिकेतील एकासह दिल्ली येथील महिलेने एक लाख ८ हजार ४०० रुपयांमध्ये महिलेची आॅनलाईन फसवणूक केली. दोघांविरुद्ध सारंगखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कळंबू येथील नोकरदार असलेल्या ३२ वर्षीय महिलेने शादी डॉट कॉम या अ‍ॅप्सवर आपले प्रोफाईल टाकले होते. अमेरिकेतील सायरिया येथील दिपक अरुण असारकर यांनी प्रोफाईलवरील मोबाईल क्रमांकावरून महिलेशी संपर्क साधला. व्हॉट्सअपवर चॅटींग करून प्रोफाईल आवडल्याचे सांगितले, शिवाय विवाहाचा प्रस्ताव देखील ठेवला. यानिमित्त पाच हजार डॉलर गिफ्ट म्हणून पाठविले आहे. त्याची किंमत भारतीय चलनात ४ लाख ५४ हजार ५८७ रुपये असल्याचे सांगितले. ते पैसे खात्यात येण्यासाठी काही प्रक्रिया करावी लागेल असे सांगितले. त्यासाठी दिल्ली येथील बँकेत असलेल्या एका महिलेचा मोबाईल नंबर दिला. तिच्याशी संपर्क साधण्याचे सांगितले. दिल्ली येथील महिलेने भारतीय चलनाच्या रक्कमेपोटी चार्ज म्हणून कळंबू येथील महिलेकडून वेळोवेळी एकुण एक लाख ८ हजार ४०० रुपयांची रक्कम आॅनलाईन मागविली.
रक्कम जमा झाल्यावर मात्र अमेरिकेतील दिपक असारकर या युवकाने व महिलेने संपर्क साधणे बंद केले. आपण फसविले गेल्याचे लक्षात आल्यावर महिलेने सारंगखेडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. दोघांविरुद्ध फसवणूक आणि माहिती, तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरिक्षक चंद्रकांत सरोदे करीत आहे.


 

Web Title: The profile on Shaadi.com cost the woman dearly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.