सहा एकर क्षेत्रात घेतले 500 क्विंटल उत्पादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 14:40 IST2021-01-21T14:40:24+5:302021-01-21T14:40:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : शेती हा आतबट्ट्याचा व्यवसाय झाल्याची धारणा झाली आहे; परंतु योग्य नियोजन केल्यास तोट्यातील शेतीही ...

सहा एकर क्षेत्रात घेतले 500 क्विंटल उत्पादन
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राह्मणपुरी : शेती हा आतबट्ट्याचा व्यवसाय झाल्याची धारणा झाली आहे; परंतु योग्य नियोजन केल्यास तोट्यातील शेतीही नफ्यात येऊ शकते, याचे उदाहरण म्हणजे ब्राह्मणपुरी येथील युवा शेतकरी अविनाश युवराज पाटील यांचे देता येईल. त्यांनी सहा एकरांत तीन महिन्यांत तब्बल ५०० क्विंटल मिरचीचे उत्पादन घेतले. या मिरचीला बाजारात सरासरी ३० रुपये किलो दर मिळाला.
शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी येथील युवा शेतकरी अविनाश युवराज पाटील यांनी सहा एकर क्षेत्रात मिरची पिकाची लागवड करण्याचे ठरवले. त्यांना गुजरात राज्यातील पिंपळोद,ता. निझर येथील सुविधा ग्रुपचे मिरची उत्पादक शेतकरी योगेश पटेल यांचे मार्गदर्शन लाभले. मिरची पिकावर रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी योग्य नियोजन करून योगेश पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली फवारणी, खत, सूक्ष्म अन्यद्रव्ये याचे योग्य नियोजन केले. पाण्याची बचत व्हावी यासाठी ठिबक सिंचनाद्वारे पाणी देण्यात आले.
अविनाश पाटील हे पदवीधर असून, त्यांनी नोकरी न करता गावातच उत्पन्नाचे साधन तयार केले. पारंपरिक शेतीला बगल देत आधुनिक शेतीकडे पावले टाकत शेतात मिरची पिकाची लागवड केली. मिरची विक्रीतून त्यांना भरघोस उत्पन्न मिळत आहे.
शिमला मिरचीची लागवड
ब्राह्मणपुरी येथील शेतकरी अविनाश पाटील यांनी एकरभर क्षेत्रात नर्सरीची उभारणी करीत शिमला मिरचीचीही लागवड केली आहे. शिमला मिरचीच्या लागवडीनंतर ४५ ते ५० दिवसांत तोडणी करण्यात येणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली.
आखाती देशात मिरचीची निर्यात
अविनाश पाटील यांच्या मिरचीला विदेशातूनही मागणी येत आहे. पिंपळोद येथील योगेश पटेल यांच्या मदतीने त्यांची मिरची मुंबईसह आखाती देशातही निर्यात केली जात आहे. स्थानिक बाजारभावापेक्षा अधिकचा भाव त्यांना मिळाला. त्यांनी सुरू केलेल्या या प्रयोगाचा परिसरातील शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार आहे. गुजरात राज्यातील पिंपळोद, ता.निझर येथील योगेश पटेल यांच्या सुविधा ग्रुपच्या माध्यमातून निर्यातीसाठी योग्य असणाऱ्या मिरचीची लागवड पाटील यांनी केली आहे. मिरचीचे पीक तयार झाले की याच ग्रुपच्या माध्यमातून तोडणी करून आवश्यक ती खबरदारी घेऊन लाल रंगाच्या कट्ट्यांमध्ये पॅकिंग केले जाते.