शहादा तालुक्यातील उजळोद येथे तीव्र पाणीटंचाईची समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 12:12 IST2019-02-19T12:12:12+5:302019-02-19T12:12:36+5:30
शहादा : तालुक्यातील ४१ गावे आणि १५ पाड्यांचा जिल्हा प्रशासनाने टंचाई कृती आराखड्यात समावेश केला आहे़ यातील बहुतांश गावांमध्ये ...

शहादा तालुक्यातील उजळोद येथे तीव्र पाणीटंचाईची समस्या
शहादा : तालुक्यातील ४१ गावे आणि १५ पाड्यांचा जिल्हा प्रशासनाने टंचाई कृती आराखड्यात समावेश केला आहे़ यातील बहुतांश गावांमध्ये पाणीटंचाई दिवसेंदिवस तीव्र होत आहे़ यातील उजळोद येथे भीषण स्थिती असून गावाच्या मधोमध असलेल्या नाल्यात केलेल्या बोअरवेल निरुपयोगी ठरत असल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण सुरु आहे़
शहादा शहरापासून साधारण १५ किलोमीटर पूर्वेला असलेल्या उजळोद गावाची लोकसंख्या ही एक हजार ३३३ एवढी आहे़ गावात एकूण २७३ घरे आहेत़ बहुतांश शेतकरी आणि मजूर कुटूंबांचा रहिवास असलेल्या या गावात गेल्या १५ वर्षात पाणीटंचाईने ग्रासले आहे़ गावासोबत शेतकऱ्यांनी खोदलेल्या बोअरवेल ह्या ७०० फूटापर्यंत आहेत़ ५०० फूटाच्या पुढेच पाणी लागत असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत़ गावाच्या मध्यभागातून नैसर्गिकरित्या उत्तरेकडून वाहत येणारा नाला आहे़ या नाल्यामुळे गावाचे दोन भाग पडले आहेत़ बारमाही नसला तरी पावसाळा आणि नंतरचे दोन महिने पाणी रहात असल्याने १५ वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीने येथेच कूपनलिका केली होती़ तत्पूर्वी याच नाल्यात खोदलेल्या विहिरीतून पाणीपुरवठा होत होता़ कूपनलिकेतून साधारण १० वर्षे पाणी मिळाल्यानंतर दूषित आणि क्षारयुक्त पाणी येण्यास सुरुवात झाल्याने ही योजना बंद करुन त्यालगतच दुसरी योजना सुरु करण्यात आली़ यातूनही दूषित पाणी आल्याने दोन्ही योजना बंद करण्यात आल्या आहे़ यातून सातत्याने पाणीटंचाई निर्माण होत असल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण सुरु होती़ एप्रिल २०१८ मध्ये ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ यांच्या सहभागातून गावात तिसरी योजना खोदण्यात आली़ तब्बल ७०० फूट खोल अशा या योजनेतून आता पाणी पुरवठा होत असला तरी तो कधी बंद होईल याची शाश्वती नसल्याने ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ पर्यायी स्त्रोतांसाठी शासनाकडे पाठपुरावा करत आहेत़