अशैक्षणिक कामांच्या बोझ्याखाली दबला प्राथमिक शिक्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:09 IST2021-02-05T08:09:26+5:302021-02-05T08:09:26+5:30
नंदुरबार : जिल्हा परिषद शाळेकडे ग्रामीण भागासह शहरी भागातील विद्यार्थी वळू लागले आहेत. गुणवत्तावाढीसह डिजिटल शाळा उपक्रम, हसत खेळत ...

अशैक्षणिक कामांच्या बोझ्याखाली दबला प्राथमिक शिक्षक
नंदुरबार : जिल्हा परिषद शाळेकडे ग्रामीण भागासह शहरी भागातील विद्यार्थी वळू लागले आहेत. गुणवत्तावाढीसह डिजिटल शाळा उपक्रम, हसत खेळत शिक्षण आदी विविध माध्यमातून शिक्षण दिले जात आहे. त्यामुळे शिक्षकांवरील जबाबदारी वाढली आहे. असे असले तरी जिल्हा परिषद शिक्षकांना इतर अशैक्षणिक कामांचा व्याप मात्र कमी झालेला नाही. दिवसेंदिवस हा व्याप अधिकच वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या अशैक्षणिक कामांच्या ओझ्याखाली शिक्षक दबला जात आहे.
जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती पाहता दुर्गम भागातील शाळांमधील शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकविण्याची कसरत करावी लागते. त्यातच गुणवत्ता वाढ करणे, शाळाबाह्य शिक्षकांना शाळेच्या मुख्य प्रवाहात आणणे आदी कामे करावी लागतात. गुणवत्तेचा दर्जा टिकविण्यासाठी आणि तो वाढविण्यासाठी अधिकारी वर्गाकडून नेहमीच दबाव असतो. अशा स्थितीत शिक्षकांना अशैक्षणिक कामांना देखील सामोरे जावे लागते. त्यात जाणारा वेळ लक्षात घेता त्याचा परिणाम दैनंदिन अध्यापनावर होत असतो. त्यामुळे अशैक्षणिक कामे कमी करणे आवश्यक आहे.
द्विशिक्षकी शाळांना अडचणी...
जिल्ह्यात एक शिक्षकी शाळा नाहीत. ज्या ठिकाणी द्विशिक्षकी शाळा आहेत तेथे तर अशैक्षणिक कामे करताना शिक्षकांना अडचणी येतात. अशैक्षणिक कामासाठी एक शिक्षक व्यस्त राहिल्यास दुसरा शिक्षक एक ते चार वर्ग शिकवतो. त्यातच जर द्विशिक्षकी शाळेत जर दोन्ही महिला शिक्षिका राहिल्या तर अडचणी आणखी वाढतात. अशावेळी संबंधित शिक्षकांना वरिष्ठ कार्यालयाकडून सोपविलेल्या अशैक्षणिक कामांना प्रथम प्राधान्य द्यावे लागते. परिणामी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अध्यापनावरही परिणाम होतो.
योजनांचे ओझे...
n जिल्हा परिषद शिक्षकांना २६ प्रकारची अशैक्षणिक कामे करावी लागतात. त्यामुळे शिक्षकांना अडकून राहावे लागते.
n मतदार नोंदणी, मतदानाच्या वेळी मतदार स्लिपा वाटणे, जनगणना, वेळोवेळी येणारे इतर सर्वेक्षण करणे यासह इतर कामे असतात.
n शालेय वर्गखोली, शौचालय बांधकाम, पोषण आहार वाटप, शिष्यवृत्ती वाटप यासह इतर अनेक कामे असतात.
n शाळा डिजिटल करणे, विविध शैक्षणिक प्रशिक्षण यांना उपस्थित राहणे, शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शाळेत आणणे, त्यांचे सर्वेक्षण करणे आदी कामांचाही समावेश आहे.
गुणवत्ता वाढीसाठी एकीकडे शिक्षक प्रयत्न करतात. दुसरीकडे मात्र अशैक्षणिक कामाचा बोजा असतो. शासनाच्या आदेशाचे पालन करणे हे प्रत्येक कर्मचाऱ्याचे कर्तव्य आहे. जर अशैक्षणिक बोजा कमी झाला तर शिक्षकांनाही ते सोयीचे होईल. -रामकृष्ण बागल,
राज्य कार्यकारिणी सदस्य, शिक्षक परिषद.
शासनाच्या आदेशान्वये नेहमीच शिक्षक कामे करतात. ते आमचे कर्तव्यच आहे, परंतु शैक्षणिक सत्राच्या काळात अशा कामांचा बोजा कमी केला जावा. तसे झाल्यास शिक्षकांना अध्यापनावर लक्ष केंद्रीत करता येईल. त्यादृष्टीने विचार व्हावा. -अशोक देसले,
जिल्हा सरचिटणीस,अखिल प्राथमिक शिक्षक संघ.