प्राथमिक आरोग्य केंद्र व शासकीय आश्रमशाळांना जि.प. अध्यक्षांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 12:40 IST2020-02-09T12:40:03+5:302020-02-09T12:40:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अॅड.सीमा वळवी यांनी तालुक्यातील बोरद येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व शासकीय ...

प्राथमिक आरोग्य केंद्र व शासकीय आश्रमशाळांना जि.प. अध्यक्षांची भेट
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अॅड.सीमा वळवी यांनी तालुक्यातील बोरद येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व शासकीय आश्रमशाळांना भेटी दिल्या. या वेळी त्यांनी रूग्णांना चांगली सेवा आणि विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्वक शिक्षण देण्याच्या सूचना संबंधित प्रशासनास दिल्या. दरम्यान, त्यांनी रूग्णांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेत त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे संबंधितांना सांगितले.
नंदुरबार जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा अॅड.वळवी यांनी आपला कार्यभार हाती घेतल्यानंतर प्रथमच तळोदा तालुक्यातील बोरद, मोरवड येथील आरोग्य केंद्र व उपकेंद्रास भेट दिली. त्यांच्या समवेत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.महेंद्र चव्हाण, त्यांचे खाजगी स्वीय सहाय्यक सुधाकर पाटील उपस्थित होते. प्रारंभी त्यांनी मोरवड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट दिली. तेथे औषधांचा साठा, नोंदवही, कर्मचाऱ्यांच्या गाव भेटी आदी बाबींची तपासणी केली. त्यात समाधान आढळून आले. त्यानंतर प्राथमिक शाळेस भेट दिली. विद्यार्थ्यांचे पुस्तक वाचन घेतले होते. परंतु विद्यार्थ्यांना धड वाचन करता येत नसल्याचे पाहून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यात सुधारणा करण्याची सक्त ताकीद शिक्षकांना दिली. त्यानंतर त्यांनी बोरद प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट दिली. तेथे आॅपरेशन कॅम्पसाठी सर्वच कर्मचारी गुंतलेले होते. या भेटीत त्यांनी औषधांचा साठा तपासून पाहिला. त्याचबरोबर रूग्णांशीदेखील संवाद साधून त्यांची समस्या जाणून घेतली. याप्रसंगी रूग्णांनी चांगली सेवा मिळत असल्याचे सांगितले. तरीही चांगली सेवा व रुग्णांना आपुलकी देण्याची सूचना कर्मचाऱ्यांना देवून मोठ्या प्रमाणात रूग्ण शासकीय रूग्णालयात उपचारासाठी वळले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यांनी रूग्णालयाच्या बांधकामाचीही पाहणी करून बांधकाम दर्जात्मक राखण्याची सूचना केली.
बोरद जवळ असलेल्या शासकीय आश्रमशाळांनादेखील त्यांनी भेट दिली. त्या वेळी विद्यार्थी जेवन करीत होते. नवीनच सुरूवात केलेल्या सेंट्रल किचन पद्धतीची तपासणी केली. याप्रसंगी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधत भौतिक सुविधांची माहिती घेतली. विद्यार्थ्यांना आरोग्य सुविधा तत्काळ मिळण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करण्याची सूचना त्यांनी दिली. आश्रमशाळांना पुरविण्यात आलेल्या रूग्णवाहिकेच्या नियमिततेबाबत माहिती जाणून घेतली. या वेळी आश्रमशाळेतील सर्वच कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ.रेखा शिंदे व कर्मचारी उपस्थित होते.