भाव सर्वसामान्यांच्या आवाक्यात असल्याने आंब्याचा ‘गोडवा’ वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 11:56 IST2019-05-15T11:56:41+5:302019-05-15T11:56:58+5:30
नंदुरबार : मागील वर्षी सर्वसाधारण झालेल्या पावसामुळे पाण्याअभावी गुजरातेतून आंब्याची आवक मंदावली आहे़ परंतु त्याची भर आंध्र प्रदेशातून जादा ...

भाव सर्वसामान्यांच्या आवाक्यात असल्याने आंब्याचा ‘गोडवा’ वाढला
नंदुरबार : मागील वर्षी सर्वसाधारण झालेल्या पावसामुळे पाण्याअभावी गुजरातेतून आंब्याची आवक मंदावली आहे़ परंतु त्याची भर आंध्र प्रदेशातून जादा आवक होऊन भरुन काढली जात आहे़ त्यामुळे साहजिकच आंब्याचे भावसुध्दा सर्वसामान्यांच्या आवाक्यात असल्याने ‘गोडवा’ वाढला आहे़
नंदुरबारात सध्या केसर, हापूस, लंगडा आदी आंब्यांना मागणी वाढली आहे़ गुजरातमधून येणारा केसर ८० ते १२० रुपये, मद्रासहून येणारा हापूस १०० ते १२० रुपये, रत्नागिरी येथून येणारा हापूस १५० ते २०० रुपये दराने विक्री केला जात आहे़ तसेच आंध्र येथून येणारा लालबाग व बदाम ५० ते ६० रुपये, तर गुजरात येथून येणारा लंगडा १०० रुपये दराने विक्री केला जात आहे़ त्यामुळे साहजिकच सर्व सामान्यांकडून सध्या मोठ्या प्रमाणात आंब्यांची खरेदी करण्यात येत असल्याचे चित्र दिसून येत आहे़ दरवर्षाच्या तुलनेत यंदा गुजरातमधून येणाऱ्या आंब्याची आवक मंदावली असली तरी याचा फार परिणाम आंब्याच्या भावामध्ये झालेला नसल्याचे सांगण्यात आले़