शहाद्यात शिवप्रेमींकडून शिवजयंतीची तयारी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:59 IST2021-02-18T04:59:26+5:302021-02-18T04:59:26+5:30

शहादा : शिवजयंतीला अवघा एक दिवस राहिला असून, युवकांमध्ये उत्साह संचारला आहे. चौकाचौकांमध्ये भगवे झेंडे, शिवरायांचे भव्य फलक लावण्यास ...

Preparations for Shiva Jayanti started by Shiva lovers in Shahada | शहाद्यात शिवप्रेमींकडून शिवजयंतीची तयारी सुरू

शहाद्यात शिवप्रेमींकडून शिवजयंतीची तयारी सुरू

शहादा : शिवजयंतीला अवघा एक दिवस राहिला असून, युवकांमध्ये उत्साह संचारला आहे. चौकाचौकांमध्ये भगवे झेंडे, शिवरायांचे भव्य फलक लावण्यास सुरुवात झाली आहे. संघटनांसह तरुणांनीही विधायक उपक्रम राबविण्याचा संकल्प केला आहे.

शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर बाजारात भगवे ध्वज, टोप्यांसह विविध प्रकारचे टॅटू, लहान व मोठ्या आकाराचे ध्वज, शर्टाला लावण्यासाठी बॅच, हातात बांधण्यासाठी बॅण्ड, महाराजांचा फोटो असलेले स्टिकर, गळ्यातील मफलर आदी वस्तू विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. त्याशिवाय मोटरसायकल व चारचाकी वाहनांना लावण्यासाठी लहान आकाराचे भगवे ध्वजही विक्रीस आले आहेत.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा शिवजयंतीचा उत्साह अधिक दिसून येत आहे. आज शेवटच्या दिवशी साहित्याची आणखी मागणी वाढेल, अशी माहिती विक्रेत्यांनी दिली आहे.

दरम्यान, शिवव्याख्यानमाला समिती, सकल मराठा समाज शहादा यांच्यातर्फे शिवजयंतीनिमित्त तीनदिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते. मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्याख्यानमाला स्थगित करण्यात आली आहे. त्याऐवजी विचारांचा जागर म्हणून तीन गटांत चित्रकला स्पर्धा व त्यांचे प्रदर्शन तसेच शिवविचार जागर वाचन कट्टा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. १९ रोजी सकाळी ११ वाजता स्टेट बँकेसमोर, महात्मा ज्योतिबा फुले चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा पूजन, चित्रप्रदर्शन व शिवविचार जागर वाचन पार पडणार आहे. कार्यक्रमप्रसंगी नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, प्रांताधिकारी डॉ. चेतन गिरासे, तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे, मुख्याधिकारी राहुल वाघ, गटविकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे, पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत, उपनगराध्यक्षा रेखा चौधरी, पंचायत समिती सदस्य शिवाजी पाटील, श्याम जाधव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

त्यानंतर शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने याच ठिकाणी सायंकाळी पाच वाजता ढोल-ताशांच्या गजरात शिवजयंती साजरी होणार आहे. या कार्यक्रमासाठी सर्व शिवप्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन सर्व समितींच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: Preparations for Shiva Jayanti started by Shiva lovers in Shahada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.