जिल्ह्यात कापूस लागवडीची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:38 IST2021-06-09T04:38:11+5:302021-06-09T04:38:11+5:30
शहरातील उद्योगांनाही झाली सुरुवात नंदुरबार : शहरातील विविध भागात दोन महिन्यांपासून बंद असलेले कोटा फरशी, बांधकाम मटेरीयल, बांधकामासाठी लागणारी ...

जिल्ह्यात कापूस लागवडीची तयारी
शहरातील उद्योगांनाही झाली सुरुवात
नंदुरबार : शहरातील विविध भागात दोन महिन्यांपासून बंद असलेले कोटा फरशी, बांधकाम मटेरीयल, बांधकामासाठी लागणारी फरशी कटाई व तयार करण्याचे उद्योग सुरू झाले आहेत. गावी परत गेलेले राजस्थानी कारागीर परत आल्यानंतर या कामांना गती आली आहे.
महामार्गावर मार्गदर्शक फलकांची वानवा
नंदुरबार : जिल्ह्यातून जाणाऱ्या विसरवाडी ते सेंधवा महामार्गाचे काम पूर्णत्वास येत आहे. कोळदे ता. नंदुरबार ते खेतियापर्यंतच्या रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. काँक्रिटीकरण असलेल्या या मार्गावर वाहने बेफाम धावत आहेत. दरम्यान, या वाहनांवर लगाम लावण्यासाठी विविध सूचना फलक, वाहतूक नियमावली तसेच गावदर्शक फलक मात्र लागलेले नाहीत. यातून पररराज्यातून येणाऱ्या वाहनधारकांना अडचणी येत आहेत.
पथदिवे दुरुस्त करा
नंदुरबार : शहरातील म्हाडा काॅलनीतील काही पथदिवे नादुरुस्त असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले आहे. तसेच काही पथदिवे हे झाडांमध्ये अडकल्याने रस्त्यांवर पडणारा दिव्यांचा प्रकाश कमी झाला आहे. याकडे पालिका प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.
अवैध धंदे त्रासदायक
नंदुरबार : शहरातील काशिबा गुरव चाैक ते बायपास रोडवरील संत सेना महाराज चाैकापर्यंतच्या नवीन रस्त्यालगत झाडांच्या सावलीत अवैध मद्यविक्री सुरू आहे. याकडे संबंधित पोलीस ठाण्याकडून दुर्लक्ष होत आहे. याबाबत नागरिकांनी तक्रारी करूनही कार्यवाही झालेली नाही.
पाऊस येण्यापूर्वी खड्डे दुरुस्त करावेत
नंदुरबार : शहरातील विविध भागात पालिकेने तयार केलेल्या विस्तृत रस्त्यांची नागरिकांकडून वाट लावली गेली आहे. अनेक ठिकाणी चांगल्या रस्त्यांना खोदून नवीन पाइपलाइन टाकणे, दुरुस्ती केली गेली आहे. दरम्यान, आता या रस्त्यांची दुरुस्ती पहिला पाऊस कोसळण्यापूर्वी करण्याची मागणी होत आहे. पावसाच्या पाण्यात हे खड्डे न दिसल्यास अपघात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आंब्यांना पसंती
नंदुरबार : तालुक्यासह नवापूर तालुक्याच्या विविध भागांतील गावराणी आंबे खवय्यांच्या पसंतीस येत आहेत. गोल आणि आकाराने लहान असलेल्या या आंब्याला मोठी मागणी असते. सोमवारी बाजारात आदिवासी महिला टोपले घेऊन गावराणी आंबा विक्रीसाठी आल्याचे दिसून आले होते.
फिरते पथक गरजेचे
धडगाव : तालुक्यातील विविध भागात आरोग्य विभागाने फिरते रॅपिड अँटिजेन टेस्ट किंवा स्वॅब संकलन केंद्र सुरू करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. यातून दुर्गम व अती दुर्गम भागातील नागरिकांमधील कोरोनाची भीती दूर होऊन त्यांच्या लसीकरणाचा वेग वाढणार आहे.
रॅपिड टेस्टवर भर
तळोदा : शहरासह तालुक्यातील मोठ्या गावांमध्ये विविध व्यवसाय सोमवारपासून पूर्ववत सुरू झाले. हे व्यवसाय सुरू करण्यापूर्वी व्यावसायिकांनी रॅपिड अँटिजन तसेच आरटीपीसीआर टेस्ट करून घेतल्याची माहिती देण्यात आली होती. यासाठी व्यापारी स्वत:च स्वॅब संकलन केंद्रात गेले होते.
खासगी वाहतूक सुरू
नंदुरबार : शहरातून शहादा, तळोदा व इतर तालुक्यात जाण्यासाठी खासगी प्रवासी वाहने उपलब्ध झाली आहेत. लाॅकडाऊनमुळे मोजक्याच वाहनधारकांची वाहने धावत असल्याचे दिसून आले होते. परंतु सोमवारी सर्व व्यवहार पूर्ववत सुरू झाल्यानंतर सर्व वाहने नियमित सुरू झाली आहेत.