उन्हाच्या चटक्यांमुळे उसाच्या रसाला पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:34 IST2021-03-09T04:34:13+5:302021-03-09T04:34:13+5:30
शहादा तालुक्यातील शहादा-खेतिया रस्ता परिसरात अनेक ठिकाणी रसवंती सुरू झाल्या आहेत. उन्हाळ्यात शीतपेयापेक्षा अनेक जण उसाचा ताजा रस घेण्यास ...

उन्हाच्या चटक्यांमुळे उसाच्या रसाला पसंती
शहादा तालुक्यातील शहादा-खेतिया रस्ता परिसरात अनेक ठिकाणी रसवंती सुरू झाल्या आहेत. उन्हाळ्यात शीतपेयापेक्षा अनेक जण उसाचा ताजा रस घेण्यास पसंती देतात. शिवाय परिसरात उसाचे क्षेत्र वाढल्याने भरउन्हाळ्यातही ऊस सहज उपलब्ध होऊ शकत असल्याने अनेकांनी रसवंतीचा व्यवसाय सुरू केला आहे. गेल्यावर्षी लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवसायांवर गंडांतर आल्याने रसवंती व्यावसायिक मोठ्या अडचणीत आले होते. अनेकांना रसवंतीसाठी लावलेला ऊस वाळू द्यावा लागला होता. भरउन्हाळ्यात लॉकडाऊन असल्याने रसवंतींसह शीतपेय व्यावसायिकांना मोठा तोटा सहन करावा लागला. यात परप्रांतीय व्यावसायिकांनाही मोठा फटका बसला होता. यावर्षी पुन्हा लॉकडाऊनमुळे आमचा व्यवसाय अडचणीत येतो की काय अशी भीती रसवंती चालकांनी बोलून दाखविली. लॉकडाऊनमुळे अनेक छोट्या-मोठ्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ येते. अशावेळी हे व्यवसाय पूर्णतः बंद न करता कोरोनाबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे तंतोतंत पालन करून सुरू ठेवावे, अशी मागणी लहान व्यावसायिकांकडून होत आहे.