प्रवासी मार्ग निवारे बांधकाम कधी होणार
नंदुरबार : तालुक्यातील मुख्य रस्त्यांवरील गावांमध्ये प्रवासी निवारे उभारण्याची मागणी होत आहे. नव्याने तयार झालेल्या कोळदे ते खेतिया दरम्यानच्या रस्त्यावर कोळदे, लहान शहादे, समशेरपूर, शिंदे व कोरीट फाट्यावर निवारे नसल्याने प्रवासी उन्हात उभे राहतात.
सेंद्रिय भाजीपाल्याला पसंती
नंदुरबार : तालुक्यातील पूर्व भागात पिकवला जाणारा भाजीपाला शहरातील नागरिकांची पसंती ठरत आहे. मर्यादित वेळेत भाजीपाला विक्रीसाठी बाजारपेठ मिळत असल्याने बहुतांश शेतकरी मुख्य रस्त्यांलगत भाजीपाला स्टाॅल लावून त्यांची विक्री करत आहेत. यातून त्या-त्या मार्गांनी प्रवास करणारे भाजीपाला खरेदी करण्यास पसंती देत आहेत. विशेष बाब म्हणजे अनेकजण शहरातून भाजीपाला खरेदीसाठी येथे जातात.
गतिरोधकांची मागणी
नंदुरबार : दोंडाईचा ते नंदुरबार रस्त्यावर रनाळे गावाजवळील वटबारे फाट्यावर गतिरोधकांची मागणी आहे. भरधाव वेगात येणाऱ्या वाहनांमुळे या मार्गावर गतिरोधकांची अपेक्षा आहे. वटबारे गावाकडून भरधाव वेगात येणाऱ्या वाहनांना अपघात होण्याची भीती असल्याने येथे गतिरोधक आवश्यक आहेत.
हार्वेस्टर रवाना
नंदुरबार : रब्बी हंगामातील गहू कापणीसाठी मार्च महिन्यापासून जिल्ह्यात दिसून येणारे कापणीचे हार्वेस्टर मशीन पंजाब राज्यात रवाना झाले आहेत. शहादा, तळोदा व नंदुरबार तालुक्यात दरवर्षी गहू कापणीसाठी हे अवजड यंत्र दाखल होतात. यातून कापणी कमी वेळेत होऊन गहू बाजारात दाखल होतो.
टरबुजांची आवक घटली
नंदुरबार : जिल्ह्यातील विविध भागांतून बाजारपेठेत होणारी टरबुजाची आवक कमी झाली आहे. बाजारपेठेत दर दिवशी ट्रॅक्टर भरून टरबुजांची आवक सुरू होती. परंतु वातावरण बदलामुळे टरबूज खराब होण्याचे प्रकार वाढीस लागल्याने शेतकरी या टरबुजांची काढणी करण्याऐवजी त्यावर गुरे चराई करून शेत साफ करत आहेत. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी रस्त्यांच्या कडेला टरबूज फेकून दिल्याचे दिसून येत आहे.
शेतीकामांना गती
रांझणी : तळोदा तालुक्याच्या विविध भागात खरीपपूर्व शेतीकामांना गती देण्यात आली आहे. येत्या दोन ते तीन दिवसात पावसाची शक्यता असल्याने शेतकरी शेतात नांगरटी करण्यासह इतर कामे आटोपत आहेत. सोबत बियाणे खरेदीसाठीही लगबग सुरू असल्याचे दिसून येत आहे.
टोमॅटो आवक
नंदुरबार : शहरातील बाजारपेठेत सध्या टोमॅटो आवक वाढल्याचे दिसून येत आहे. नंदुरबार तालुक्याच्या विविध भागातून हे टोमॅटो बाजारात येत असून, अत्यंत कमी दराने त्याची खरेदी होत आहे. पावसाळ्याला सुरुवात होणार असल्याने टोमॅटो काढणीच्या कामांना गती देण्यात आली आहे.
शिवण नदीवरील पूल अद्याप कठड्याविना
नंदुरबार : नंदुरबार ते विसरवाडी दरम्यान शिवण नदीवरील पूल वाहनधारकांसाठी धोकादायक ठरत आहे. महामार्ग म्हणून घोषित असलेल्या या रस्त्याचे नूतनीकरण अद्याप रखडले आहे. नंदुरबार ते भादवड दरम्यान असलेल्या या पुलावरून दरदिवशी मोठ्या संख्येने मालवाहू आणि प्रवासी वाहनांची वाहतूक सुरू असते. परंतु कठडे नसल्याने धोेकादायक स्थिती आहे.
वाका ते नंदुरबार दरम्यान अवैध वृक्षतोड
नंदुरबार : गुजरात राज्यातील वाका चाररस्ता ते नंदुरबार दरम्यान बेकायदेशीर वृक्षतोड पुन्हा सुरू झाली आहे. मार्गाच्या दुतर्फा असलेल्या मोठ्या झाडांना खालील बाजूस आगी लावून झाडे तोडीचा हा प्रकार आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे.
दुर्गम भागात बसेस सुरू करण्याची मागणी
धडगाव : शहादा व नंदुरबार आगाराने धडगाव आणि मोलगी परिसरात बसेसच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी आहे. १ जूनपासून जिल्ह्यात बसेस सुुरू झाल्या आहेत. यांतर्गत धडगाव व मोलगी परिसरात बसफेऱ्या सुरू करण्याची मागणी होत आहे.