रब्बी पिकांसाठी रात्रीऐवजी दिवसा वीजपुरवठा करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:57 IST2021-02-06T04:57:25+5:302021-02-06T04:57:25+5:30
जयनगर, धांद्रे, उभादगड, निंभोरे, कोंढावळ, कहाटूळ परिसरात रब्बी हंगामातील पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली आहे. पण या रब्बी हंगामातील ...

रब्बी पिकांसाठी रात्रीऐवजी दिवसा वीजपुरवठा करावा
जयनगर, धांद्रे, उभादगड, निंभोरे, कोंढावळ, कहाटूळ परिसरात रब्बी हंगामातील पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली आहे. पण या रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्यासाठी रोहित्रानुसार शेतकऱ्यांना आठ दिवस रात्री व आठ दिवस दिवसा वीजपुरवठा होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रपाळीत अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून, थंडीमुळे रात्रभर उभे राहून पिकांना पाणी देणे मुश्कील झाले आहे. रात्रपाळीची वीज कायम असल्यामुळे शेतकऱ्यांना हिंस्र प्राणी तसेच सरपटणार्या प्राण्यांपासूनही जीवितास धोका निर्माण झाला आहे. रात्री आठ दिवस वीज न देता कृषिपंपासाठी कायमस्वरूपी दिवसा वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून बऱ्याच दिवसांपासून होत असतानाही रात्रपाळीचीच शिफ्ट चालू आहे.
रात्रपाळीत रात्री उशिरा वीज येत असल्यामुळे शेतकऱ्यांना सोबत बॅटरी आणि काठी घेऊन शेतात जावे लागते. रात्री-अपरात्री पाणी भरत असताना डीपीवर तांत्रिक बिघाड झाल्यास त्यावेळेस शेतकऱ्यांना पाणी असूनही पिकांना पाणी देता येत नाही. रात्री तांत्रिक बिघाड झाल्यास शेतकरी वायरमनलाही शेतात डीपी दुरुस्तीसाठी बोलवू शकत नाही किंवा स्वतःही डीपीवरील फ्यूज किंवा डिओ उडाला असल्यास अंधाऱ्या रात्रीत दुरुस्ती करू शकत नसल्यामुळे पिकांना पाणी न देता शेतकऱ्यांना रात्रीचा मुक्काम शेतातच करावा लागत आहे. रात्रीच्या शिफ्टमुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून, शेतीसाठी कायमस्वरूपी दिवसा वीज उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.