वीज वाहिन्यांना पावसाळ्यात वारा, वादळाने झाडाझुडपांच्या फांद्या लागून वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार होतात. त्यामुळे रात्री-अपरात्री सरपटणाऱ्या प्राण्यांपासून धोका असतो. झाड वाहिनीवर पडून विद्युत वाहिन्या, विद्युत खांब कोसळतात. परिणामी, वीजपुरवठा खंडित होऊन नुकसानही सहन करावे लागते, तसेच पावसाळ्यात चिखलामुळे दुरुस्तीच्या कामांना अडचणी येतात. त्या अनुषंगाने वीज वितरण कंपनीच्या शहादा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मान्सूनपूर्व दुरुस्तीची कामे करण्याची गरज आहे. वीज वाहिन्यांना अडथळा निर्माण करणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडून त्यांची कटिंग करून वीज वाहिन्या व्यवस्थित करून पावसाळ्यात वीजपुरवठा सुरळीत करावा.
शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरीसह परिसरात गेल्या आठ दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यामुळे ठिकठिकाणी विजेचे खांब वाकले होते. त्यामुळे वीज तारा लोंबकळत असून पावसाळ्यात धोका निर्माण होऊ शकतो. लोंबकळणाऱ्या वीज तारांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
दरम्यान, लोहारा परिसरात वादळी वाऱ्यामुळे वीज खांबांची पडझड झाली होती. त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू असून हे काम पूर्ण झाल्यानंतर ब्राह्मणपुरी येथील वीज तारांची दुरुस्ती करण्यात येईल, असे ब्राह्मणपुरी युनिटचे सहायक अभियंता मधू गावित यांनी सांगितले.