विजेअभावी स्मार्ट कार्ड वितरण ठप्प : नंदुरबार आरटीओ कार्यालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 12:33 PM2018-01-12T12:33:23+5:302018-01-12T12:33:31+5:30

Power-free distribution of smart card distribution: Nandurbar RTO office | विजेअभावी स्मार्ट कार्ड वितरण ठप्प : नंदुरबार आरटीओ कार्यालय

विजेअभावी स्मार्ट कार्ड वितरण ठप्प : नंदुरबार आरटीओ कार्यालय

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : प्रादेशिक परिवहन विभागातर्फे 1 जानेवारीपासून देण्यात येणारे स्मार्ट कार्ड नंदुरबारात अद्याप एकाही व्यक्तीला असे कार्ड वितरीत केले नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे या कार्डसाठी अनेक वाहनचालकांनी आपली सर्व कागदपत्रे जमा केलेली आहेत. त्यामुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान, संबधीत ठेकेदार आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्यात समन्वय नसल्यामुळे ही वेळ आली आहे.
परिवहन विभागातर्फे विविध उपक्रम राज्यस्तरावर राबविले जात आहेत. परंतु नंदुरबार कार्यालयातर्फे याबाबतची अंमलबजावणी फारशी होत नसल्याची स्थिती आहे. आता नव्याने स्मार्ट कार्ड वितरणाच्या संदर्भात देखील तीच बोंब सुरू असून दहा दिवसात एकही स्मार्ट कार्ड वितरीत केले गेले नसल्याची स्थिती आहे.
काय आहे स्मार्ट कार्ड
वाहनधारकांना आतार्पयत वाहनांची वेगवेगळी कागदपत्रे सांभाळावी लागत होती. त्यासाठी एक फाईलच घेवून फिरावी लागत होती. राज्य किंवा राष्ट्रीय परमीट असलेल्या वाहनाधारकांना तर अशी फाईल बाळगतांना किंवा घेवून फिरतांना मोठी कसरत करावी लागते. फाईल हरवली तर किंवा गहाळ झाली तर दुसरे कागदपत्रे मिळविण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर फिरफिर करावी लागत होती. आता हे सर्व थांबणार आहे. एटीएम कार्डसारखे नवीन स्मार्टकार्ड राहणार आहे. त्यात असलेल्या एका चिपमध्ये वाहन मालकाचा संपुर्ण डाटा राहणार आहे. वाहनांची माहिती, चेसीस नंबर, पासींग नंबर यासह इतर आवश्यक माहिती या चिपमध्ये साठवली जाणार आहे. स्मार्ट कार्डमधील चिपसह संबधीत कार्यालयात देखील हा डाटा संकलीत राहणार आहे. स्मार्ट कार्डवर नाव आणि नंबर राहणार आहे. तो नंबर  सांभाळून ठेवणे आवश्यक आहे.
हे कार्ड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या किंवा जेथे तपासणीसाठी उपकरण असेल तेथे स्वाईप केल्यावर संबधीत उपकरणाच्या स्क्रिनवर सर्व माहिती दिसू शकणार आहे.
विजेची समस्या
स्मार्ट कार्ड वितरीत करण्याचे कंत्राट ज्या कंपनीला देण्यात आले आहे त्या कंपनीने अद्याप वीज पुरवठा घेतला नसल्यामुळे नंदुरबारात स्मार्ट कार्ड वितरीत होत नसल्याची समस्या आहे. संपुर्ण राज्यात संबधीत कंपनीला ठेका दिला गेला आहे. त्यांनी स्वत: वीज पुरवठा घेवून हे काम करावयाचे आहे. नंदुरबारात सर्व मशिनरी आणि इतर साहित्य दाखल आहे. केवळ वीज पुरवठा मिळाला तर लागलीच कामाला सुरुवात होणार आहे. यासंदर्भात येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी भोये यांनी राज्य कार्यालयाकडे पाठपुरावा सुरू ठेवला आहे. 
अनेकांना अडचणीचे 
1 जानेवारीपासून नवीन स्मार्ट कार्डचे वितरण करणे आवश्यक आहे. नवीन वाहन नोंदणी, वाहन हस्तांतरण, विक्री किंवा इतर बाबीसाठी अनेकांनी आपली कागदपत्रे उपप्रादेशिक कार्यालयात जमा करून ठेवले आहेत. त्यांना कागदपत्रेही मिळत नाहीत आणि स्मार्ट कार्डही मिळत नसल्यामुळे अनेकांचे व्यवहार अडकले आहेत. ज्यांना राष्ट्रीय परमीट आहे त्यांची मोठी गैरसोय झाली आहे. दहा दिवसापासून अनेकजण या कार्यालयाच्या चकरा मारून परत फिरून जात आहेत.  यामुळे वाहनधारकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. तातडीने ही समस्या मार्गी लावावी व स्मार्टकार्ड वितरण यंत्रणा कार्यान्वीत करण्याची मागणी आहे.
 

Web Title: Power-free distribution of smart card distribution: Nandurbar RTO office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.