पोस्ट पेमेंट बँकेकडून लाॅकडाऊन काळात जिल्ह्यात तीन कोटी वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 13:01 IST2020-12-16T13:01:24+5:302020-12-16T13:01:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पोस्टल विभागाने सुरू केलेल्या इंडियन पोस्ट पेमेंट बँकेकडून लाॅकडाऊन काळात ग्रामीण भागात अडकून पडलेल्या ...

पोस्ट पेमेंट बँकेकडून लाॅकडाऊन काळात जिल्ह्यात तीन कोटी वाटप
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : पोस्टल विभागाने सुरू केलेल्या इंडियन पोस्ट पेमेंट बँकेकडून लाॅकडाऊन काळात ग्रामीण भागात अडकून पडलेल्या नागरिकांना मोठे सहाय्य केले आहे. जिल्ह्यात पोस्ट बँकेचे एकूण ५३ हजार खातेदार असून, या खातेदारांना ३ कोटी रुपयांचे वाटप मे महिन्यापासून अविरत करण्यात आले आहे.
नंदुरबार जिल्ह्यात पोस्ट पेमेंट बँकेचे मुख्यालय नवापूर येथे करण्यात आले आहे. याठिकाणी पोस्ट खात्याकडून खाती काढण्यात आलेल्या ५३ हजार ग्राहकांच्या खात्यांचे कामकाज करण्यात येते. प्रत्यक्षात घरापर्यंत पोहोचणा-या पोस्टमनच्या आधारे हे कामकाज सुरू करण्यात आले आहे. पोस्टमनकडे असलेल्या मोबाईलमध्ये ॲप डाऊनलोड करून देत घरोघरी असलेल्या खातेधारकांना घरी जावून त्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली आहे. पैसे काढण्याची मागणी, शासनाकडून आलेले पैसे आदीप्रकारे हे कामकाज करण्यात आले आहे. जिल्ह्यात पोस्ट बँकेचे प्रमुख खातेदार हे ग्रामीण भागातील नागरिक, मातृवंदना योजनेच्या महिला लाभार्थी, शालेय विद्यार्थी, आदिवासी आश्रमशाळांचे विद्यार्थी, शिष्यवृत्तीधारक महाविद्यालयीन विद्यार्थी, रोजगार हमी योजनेत काम करणारे मजूर यासह विविध निराधार योजनांचे लाभार्थी आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लाॅकडाऊनमुळे या नागरिकांना घराबाहेर न पडता आल्याने तसेच शहरी भागातील बँकांमध्ये येणे शक्य नसल्याने त्यांना घरपोच पैसे देण्यात आले. तब्बल चार महिने खातेदारांना वेळेवर घरी पैसे पोहोचवण्यासाठी पोस्टमन मेहनत घेत होते. नंदुरबार जिल्ह्यातील १३ पोस्टल बिटमधून हे कामकाज सुरू होते. अद्यापही निराधार व शारीरिकदृष्ट्या कमकुवत असलेल्यांना या पोस्ट पेमेंट बँकेचा मोठा आधार आहे. पोस्टमनची संख्या कमी असली तरीही वेळेवर रक्कम पोहोचती करण्यासाठी परिश्रम घेतले जात असल्याची माहिती पोस्ट खात्याकडून देण्यात आली आहे. पोस्टल बँकेत दर दिवशी खाते काढणाऱ्यांची संख्याही वाढत असल्याचे सांगण्यात आले आहे.
गुजरातमध्ये अडकलेल्यांना करता आली मदत
पोस्ट पेमेंट बँकेमुळे शहरी भागातील बँकांमध्ये होणारी गर्दी कमी झाल्याचा दावा करण्यात आला आहे. लाॅकडाऊनमध्ये थेट घरपोच पोस्टमन जात असल्याने या योजनेची विश्वासार्हता वाढली. बाहेरगावी असलेल्यांनाही यातून पैसे पाठवणे शक्य असल्याने गुजरातसह महाराष्ट्रातील विविध भागात अडकून पडलेल्या मजुरांना परत आणण्यासाठी, तसेच त्यांना किमान पैसे पाठवण्यात पोस्ट बँकेचा मोठा हातभार आहे. या बँकेच्या माध्यमातून ग्रामीण भागातून गुजरातमध्ये कामासाठी गेलेल्या व लाॅकडाऊनमुळे उपासमार झेलणाऱ्या अनेकांना पैसे पाठवण्यात येथील ग्रामस्थांना यश आले होते.
विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि डीबीटीची रक्कम घरपोच
आदिवासी विद्यार्थ्यांना मंजूर झालेली शिष्यवृत्ती पोस्ट बँकेकडून प्राप्त करता आली. प्रामुख्याने परीक्षा आटोपून घराकडे जाण्यासाठी पैसे नसल्याने ही बँक कामी आली होती. डीबीटीची थकीत रक्कमही या बँकेच्या माध्यमातून अनेकांना गावी मिळाल्याचे सांगण्यात आले.
निराधारांना लाभ झाला
जिल्ह्यातील ५३ हजार खातेधारकांना या बँकेचा मोठा लाभ झाला. ट्रान्सफर केलेले पैसे थेट घरपोच जात होते. दुर्गम व अती दुर्गम भागापर्यंत पोस्टमन जात असल्याने विविध योजनांची जमा झालेली रक्कम माता व निराधार वृद्धांना मिळाली. मजूरांना मजूरी प्राप्त झाली.
- बी.एस.जाेशी, पोस्टमास्टर, नंदुरबार.
डाक कार्यालय.