मंदाणे -जावदा रस्त्याची दयनीय अवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:05 IST2021-09-02T05:05:42+5:302021-09-02T05:05:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जयनगर : शहादा तालुक्यातील मंदाणे गावापासून ते जावदापर्यंतच्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या ...

मंदाणे -जावदा रस्त्याची दयनीय अवस्था
लोकमत न्यूज नेटवर्क
जयनगर : शहादा तालुक्यातील मंदाणे गावापासून ते जावदापर्यंतच्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावर थोड्याथोड्या अंतरावर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये निदान मुरूम तरी टाकावा, अशी मागणी वाहनधारकांकडून करण्यात येत आहे.
शिरपूर, सारंखेडा, वडाळी, जयनगर, बामखेडा, कुकावल, कहाटूळ येथून मध्य प्रदेशकडे जाणारी वाहने मंदाणे- जावदेमार्गे मध्य प्रदेशात जात असतात. कारण असलोद-मंदाणेमार्गे मध्य प्रदेशकडे जाण्यासाठी शॉर्टकट असल्याने वाहनधारक याच मार्गाचा वापर करीत असतात. आता थोड्याच दिवसात उसाचा गळीत हंगाम सुरू होणार आहे. वडाळी, बामखेडा, जयनगर, कोंढावळ, कहाटूळ, लोंढरेसह परिसरातील गावांमधील ऊस उत्पादक शेतकरी याच मार्गाने पानसेमल येथील दुर्गा खांडसरी या कारखान्यात आपला ऊस घेऊन जातील. त्यामुळे उसाचे ट्रॅक्टर घेऊन जाताना मार्गावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे ट्रॅक्टर उलटण्याचा धोका वाढला आहे.
दिवसभर या मार्गावर वाहनांची वर्दळ असते. नेहमी प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना तर कंबरदुखीचा त्रास होत असल्याचे निदर्शनास येत आहे. थोड्याथोड्या अंतरावर मोठमोठे खड्डे पडले असल्याने वाहनधारक साईडपट्ट्यांचा वापर करताना दिसून येत आहेत. या दोन गावांदरम्यान खड्ड्यांचे प्रमाण एवढ्या प्रमाणात आहे की, खड्डे चुकविण्याच्या नादात जागोजागी लहान-मोठे अपघात होत आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने खडी - डांबर टाकण्याऐवजी निदान पावसाळ्यापुरता मुरूम टाकून खड्डे बुजवावेत, अशी मागणी वाहनधारकांकडून करण्यात येत आहे.