काकर्दे ते सिंदगव्हाण रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:27 IST2021-02-08T04:27:41+5:302021-02-08T04:27:41+5:30
नंदूरबार : नंदूरबार तालुक्यातील काकर्दे ते सिंदगव्हाण रस्त्याची दूरवस्था झाली आहे. रस्त्याची दुरुस्ती करण्याची अनेकवेळा मागणी करुनही कारवाई ...

काकर्दे ते सिंदगव्हाण रस्त्याची दुरवस्था
नंदूरबार : नंदूरबार तालुक्यातील काकर्दे ते सिंदगव्हाण रस्त्याची दूरवस्था झाली आहे. रस्त्याची दुरुस्ती करण्याची अनेकवेळा मागणी करुनही कारवाई होत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. या मार्गाने सारंगखेड्याकडे जाणाऱ्या वाहनांची मोठी संख्या आहे.
बँकेतील गर्दीमुळे ग्राहकांचे हाल
नंदूरबार : शहरातील बँकांमध्ये ग्रामीण भागातून येणाऱ्या लाभार्थीं व खातेदारांमुळे दिवसभर गर्दी दिसून येत आहे. या खातेदारांना एकाचवेळी मध्ये सोडले जात नसल्याने बँकांच्या प्रवेशद्वारावर थांबून असतात. यातून बँकांबाहेर गर्दी दिसून येत आहे. संबंधित बँकां मात्र याकडे लक्ष देत नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. बँकांना प्रशासनाने समज देण्याची अपेक्षा आहे.
नावली ते खोलविहिर रस्त्याची दुरवस्था
नंदूरबार : नवापूर तालुक्यातील नावली ते खोलविहिर दरम्यानचा रस्ता खराब झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. या मार्गाने नवापूर तालुक्यातील नागरिक हे खांडबारा व खोलघर परिसरात जातात. परंतु रस्ता खराब असल्याने त्यांना अधिक वेळ लागत आहे. रस्त्यावरची खडी पूर्णपणे उखडली असून डांबरीकरणही निघून गेल्याने चारचाकी व दुचाकी वाहनांनी प्रवास करणे अवघड होत आहे.
बसेसला गर्दी
नंदूबार : जिल्ह्यातून गुजरात जाणाऱ्या सर्व बसेसला गर्दी कायम आहे. प्रवासी विविध कामांनिमित्त दोन्ही राज्यांमध्ये प्रवास करत आहेत. यात प्रामुख्याने लग्नसोहळ्यांसाठी येणाऱ्यांची संख्या अधिक असल्याची माहिती देण्यात येत असून ही गर्दी दोन महिने नियमित राहील अशी शक्यता आहे.
बंधारे दुरवस्थेत
नंदूरबार : तालुक्याच्या विविध भागात जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाकडून बंधारे निर्माण करण्यात आले आहेत. यातील काही बंधारे हे जीर्ण झाले असून त्यांना गळती लागल्याचे दिसून येत आहे. याकडे संबधित प्रशासनाने लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी होत आहे.
अक्कलकुवा शहरातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष
अक्कलकुवा : शहरातील विविध भागात गटारी तुंबून सांडपाणी रस्त्यावर येत असल्याचे चित्र आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांची आहे. शहरातील रहिवासी वसाहतींमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा पडून असल्याच्या तक्रारी करण्यात येत आहेत. अक्कलकुवा शहरातील स्वच्छतेबाबत नेहमीच दुर्लक्ष हाेत आहे. अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग पडून आहेत.
खड्ड्यांमुळे त्रस्त
नंदूरबार : गुजरात हद्दीवरील सावळदा ता. नंदुरबार ते प्रकाशा पुलापर्यंतचा रस्ता पूर्णपणे खड्ड्यात गेला आहे. हा रस्ता दुरुस्तीबाबत कारवाई करण्यात आलेली नाही. मार्गावरुन गुजरात राज्यातून पुन्हा महाराष्ट्रात प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी असून त्यांना खड्ड्यांमुळे त्रास होत आहे.
रोहयोची कामे सुरु करण्याची अपेक्षा
धडगाव : तालुक्यातील विविध गावांमध्ये रोजगार हमी योजनेच्या कामांना सुरुवात करण्याची मागणी करण्यात आली आहे. तालुक्यातील अनेक भागातून स्थलांतर केलेले मजूर येत्या काळात परत येणार असल्याने त्यांच्या रोजगारासाठी राहयो योजनांची गरज आहे.
कायदा सखी उपक्रमाला सुरुवात
नंदूरबार : जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागांतर्गत दिग्नाग फाऊंडेशन संचलित जिल्हा महिला समुपदेशन केंद्रांमार्फत शहरातील कमला नेहरु कन्या शाळेत विधार्थिनींना कायदेविषयक महिती देण्यात आली. कायदा सखी उपक्रमांतर्गत हा उपक्रम सुरु करण्यात आला. यांतर्गत शिक्षणाचा अधिकार, गर्भपात प्रतिबंधक कायदा, सायबर गुन्हा, सोशल मीडियावर होणारे गुन्हा यासह विविध कायद्यांची माहिती देण्यात आली.
विद्यार्थिनींना ॲड.शुभांगी चौधरी यांनी माहिती दिली. यावेळी शाळेच्या विद्यार्थिनी व शिक्षिका पुनम नेरकर मॅडम उपस्थित होते. यशस्वीतेसाठी
जिल्हा समन्वयक राहुल जगताप जिल्हा समुपदेशक पुर्विशा बागुल व पगारे रूपाली यांनी परिश्रम घेतले.