कोराईकडे जाणाऱ्या अंकलेश्वर-बऱ्हाणपूर मार्गाची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:34 IST2021-08-24T04:34:11+5:302021-08-24T04:34:11+5:30
अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गाच्या मुख्य रस्त्यापासून ते खापार ग्रामपंचायत हद्दीपर्यंतच्या रस्त्यामध्ये जागोजागी खड्डे पडलेले आहेत. हा रस्ता अक्कलकुवा तालुक्यातील ...

कोराईकडे जाणाऱ्या अंकलेश्वर-बऱ्हाणपूर मार्गाची दुरवस्था
अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गाच्या मुख्य रस्त्यापासून ते खापार ग्रामपंचायत हद्दीपर्यंतच्या रस्त्यामध्ये जागोजागी खड्डे पडलेले आहेत. हा रस्ता अक्कलकुवा तालुक्यातील कोराई ग्रामपंचायत अंतर्गत येत असून, अनेक वर्ष उलटूनही या रस्त्यावर कोणत्याही प्रकारची दुरुस्ती करण्यात आली नाही. सध्या पावसाळा असल्यामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहनधारकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. तसेच वस्तीपर्यंतचा रस्ता पूर्णपणे उखडला आहे. याच रस्त्यावर ग्रामपंचायत इमारत असून, ग्रामपंचायत पदाधिकारीही याच मार्गाने ग्रामपंचायतीमध्ये येतात. कोराई येथील महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असून, तालुक्यात आर्थिकदृष्ट्या ही ग्रामपंचायत चांगली असूनही, रस्ता दुरुस्ती करण्याबाबत मार्ग निघत नाही, ही मोठी शोकांतिका आहे.
दरवर्षी ग्रामपंचायतीला केंद्र सरकारकडून मोठा निधी येतो. शिवाय घरपट्टीमधूनही मोठा महसूल ग्रामपंचायतीला मिळत आहे. त्यामुळे रस्ता दुरुस्तीसाठी राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्याचे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे. ग्रामपंचायतीशेजारीच अंगणवाडी असून, याठिकाणी वाहनांची वर्दळही असते. एकंदरीतच या रस्त्यावर मोठी वर्दळ असून, वरिष्ठांनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन अंकलेश्वर-बऱ्हाणपूर रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी यांनी केली आहे.
कोराई व खापर या दोन्ही गावांतील ग्रामीण रुग्णालय, शाळा, महाविद्यालय बँक आदी सुविधा आहेत. तसेच परिसरातील नागरिक याठिकाणी बाजारहाटसाठी येत असतात. त्यामुळे ग्रामपंचायतीने याकडे लक्ष देऊन रस्ता दुरुस्ती व भौतिक सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा आहे.
-सलमान पठाण, ग्रामस्थ, कोराई