प्रदूषणमुक्त दिपावली साजरी करावी -जिल्हाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 13:04 IST2020-11-13T13:04:09+5:302020-11-13T13:04:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : यावर्षीचा दिपावली उत्सव कोविड कालावधीत साजऱ्या केलेल्या अन्य उत्सवांप्रमाणेच पूर्ण खबरदारी घेऊन साजरा करण्याचा ...

प्रदूषणमुक्त दिपावली साजरी करावी -जिल्हाधिकारी
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : यावर्षीचा दिपावली उत्सव कोविड कालावधीत साजऱ्या केलेल्या अन्य उत्सवांप्रमाणेच पूर्ण खबरदारी घेऊन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने नागरिकांनी शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे आणि प्रदूषणमुक्त दिपावली साजरी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले आहे.
कोविड संसर्गामुळे बंद करण्यात आलेली धार्मिकस्थळे अद्यापही खुली करण्यात आलेली नाही. त्यामुळे दिपावली उत्सव हा घरगुती स्वरुपात मर्यादित राहील याची दक्षता नागरिकांनी घ्यावी. उत्सव कालावधीत नागरिकांनी विशेष करुन ज्येष्ठ नागरिक तसेच लहान बालके यांनी घराबाहेर पडण्याचे शक्यतो टाळावे. नागरिकांनी गर्दी टाळावी व मोठ्या प्रमाणात एकत्रित येऊ नये, वारवांर हात धुणे, मास्क आणि सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे.
दिपावली हा दिव्यांचा तसेच प्रकाशाचा उत्सव मानला जातो. उत्सवादरम्यान मोठ्या प्रमाणात होणाऱ्या फटाक्यांच्या आतषबाजीमुळे वायू व ध्वनी प्रदूषणाची पातळी वाढून जनसामान्यांच्या तसेच प्राणीमात्रांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. कोरोना आजारामुळे परिणाम झालेल्या अनेकांना फटाक्यांच्या धुरामुळे वायू प्रदुषणचा थेट परिणाम होऊन त्रास होण्याची भीती आहे. त्यामुळे नागरिकांनी यावर्षी फटाके फोडण्याचे टाळावे. त्याऐवजी दिव्यांची आरास मोठ्या प्रमाणावर करुन उत्सव साजरा करावा. कोणत्याही प्रकारचे दिपावली पहाटसारखे सार्वजनिक उपक्रम किंवा कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नयेत. आयोजित करावयाचे झाल्यास ऑनलाईन, केबल नेटवर्क, फेसबूक इत्यादी माध्यमांद्वारे त्याचे प्रसारण करावे. सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम, शिबीरे ,रक्तदान आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इ.आजार आणि त्याचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी. मात्र सदर ठिकाणी एकाचवेळी मोठ्या प्रमाणात नागरिक एकत्रित येणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित नगरपालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच प्रत्यक्ष सण सुरु होण्याआधी नवीन काही सूचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचेदेखील अनुपालन करावे, असे असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.