रहदारीला अडथळा आणणाऱ्या 15 व्यावसायिकांवर पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2021 13:10 IST2021-01-31T13:10:11+5:302021-01-31T13:10:17+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : रस्त्यावर हातगाड्या लावून रहदारीस अडथळा आणणाऱ्या व्यावसायिकांवर पोलिसांनी कारवाई करण्याची मोहीम हाती घेतल्याने व्यावसायिकांमध्ये ...

Police take action against 15 traders for obstructing traffic | रहदारीला अडथळा आणणाऱ्या 15 व्यावसायिकांवर पोलिसांची कारवाई

रहदारीला अडथळा आणणाऱ्या 15 व्यावसायिकांवर पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : रस्त्यावर हातगाड्या लावून रहदारीस अडथळा आणणाऱ्या व्यावसायिकांवर पोलिसांनी कारवाई करण्याची मोहीम हाती घेतल्याने व्यावसायिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. या वेळी १५ व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्यावर न्यायालयामार्फत दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
तळोदा शहरात हातगाडीधारक व्यावसायिक आपल्या हातगाड्या रस्त्यावर उभ्या करीत असतात. साहजिकच यामुळे वाहतुकीस अडथळा ठरून वाहतुकीची कोंडी होत असते. विशेषत: बसस्थानक रस्ता, स्मारक चौक, मेन रोड, हातोडा रोड अशा गजबजलेल्या ठिकाणी हे व्यावसायिक मुद्दामहून आपल्या हातगाड्या उभ्या करीत असतात. त्यांना अनेक वेळा पोलिसांनी ताकीददेखील दिली आहे. परंतु, तेवढ्यापुरते बाजूला काढून पुन्हा जैसे थे उभे करतात. साहजिकच सातत्याने कोंडी निर्माण होत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात होती. पोलिसांनी अशा व्यावसायिकांवर कारवाई करण्याची मोहीम शुक्रवारी म्हणजे बाजाराच्या दिवशी हाती घेतली आहे. तब्बल १५ व्यावसायिकांवर कारवाई केली. ही कारवाई रस्त्यावर हातगाड्या लावून रहदारीस अडथळा निर्माण करण्याबाबतच्या कलमान्वये करण्यात आली. एकाच वेळी एवढ्या संख्येने व्यावसायिकांवर कायदेशीर कारवाई केल्याने व्यावसायिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. त्यांच्यावर केसेस करून त्यांना न्यायालयात दंडात्मक कारवाई करण्याचे नोटीसमध्ये सूचित केले आहे. या व्यावसायिकांवर साधारण एक हजार ५०० ते दोन हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली जात असते. पोलिसांनी रहदारीस अडथळा आणणाऱ्या अशा हातगाडीधारकांवर कारवाईचा बडगा उगारल्याने वाहनचालक व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. परंतु, या मोहिमेत सातत्य ठेवावे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

मोकाट गुरांबाबतही ठोस कारवाई करावी
सतत रस्त्यावर बसून वाहतुकीस अडथळा आणणाऱ्या मोकाट गुरांच्या बाबतही पोलिसांनी कडक भूमिका घेण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. कारण, सदर गुरांच्या मालकांविषयी पालिकेने सपशेल गुडघे टेकल्यामुळे या पशुपालकांची मनमानी वाढली आहे. दोन दिवसांपूर्वी एक मोटारसायकलस्वार बसस्थानक रस्त्यावरून जात असताना त्याच्या वाहनापुढे मोकाट जनावरे आलीत. त्यामुळे तो जायबंदी होऊन गंभीर जखमी झाला होता. असे असताना पालिकेने मोकाट गुरांच्या बंदोबस्ताबाबत गांधारीचा अवतार घेतला आहे. निदान, पोलिसांनी तरी अशा पालकांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी तमाम तळोदेकरांची मागणी आहे.

अतिक्रमण व पर्यायी रस्त्याबाबत पालिकेला पत्र  
शहरातील वीज कार्यालयाच्या मागच्या बाजूने जाणाऱ्या हातोडा रस्त्याकडील एका ठिकाणी मोठा गतिरोधक पालिकेने बसविला आहे. येथून गाड्या काढताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असते. शिवाय, हा गतिरोधक अडथळादेखील ठरत आहे. त्यामुळे अवजड वाहनेही शहरातील बाजारपेठेकडूनच जात असतात. साहजिकच रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत असते. त्यामुळे नागरिकांनासुद्धा जीव मुठीत घालून मार्गक्रमण करावे लागत असल्याची व्यथा आहे. ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन पोलिसांनी नगरपालिकेस पत्र देऊन पर्यायी रस्ता देण्याचे सुचविले आहे. याशिवाय  बाजारपेठेत व्यावसायिक आपल्या दुकानाबाहेर माल ठेवून अतिक्रमण करीत असतात. त्यामुळे हे अतिक्रमण हटविण्यासाठी पोलिसांना आपले वाहन व पाच कर्मचारी उपलब्ध करून देण्याची मागणी पालिकेकडे केली आहे. आता पालिकेने या प्रकरणी सकारात्मक भूमिका घेऊन पोलिसांना सहकार्य करण्याची अपेक्षा नागरिकांनी केली आहे.

Web Title: Police take action against 15 traders for obstructing traffic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.