प्रकाशा येथे पोलीस स्टेशन कार्यान्वित करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:33 IST2021-08-27T04:33:05+5:302021-08-27T04:33:05+5:30
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सद्य:स्थितीत प्रकाशा येथे पोलीस दूरक्षेत्र कार्यान्वित आहे. प्रकाशा येथे वर्षभर धार्मिक कार्यक्रम होतात. महाशिवरात्री, ...

प्रकाशा येथे पोलीस स्टेशन कार्यान्वित करावे
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सद्य:स्थितीत प्रकाशा येथे पोलीस दूरक्षेत्र कार्यान्वित आहे. प्रकाशा येथे वर्षभर धार्मिक कार्यक्रम होतात. महाशिवरात्री, श्रावण महिना, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दशा माता उत्सव, कार्तिक स्वामी उत्सव, अडभंगनाथ, खंडेराव महाराजांची यात्रा, वर्षभर चालणाऱ्या तापी व नर्मदा परिक्रमाचे भाविक, सत्संग, प्रवचनासाठी भाविकांची गर्दी होते. या सर्व कार्यक्रमांसाठी पोलिसांचा बंदोबस्त मुक्कामी ठेवावा लागतो. येथे पोलीस स्टेशन कार्यान्वित झाले तर ही वेळ येणार नाही, तसेच या दूरक्षेत्राच्या कार्यक्षेत्रातील शेतशिवारात नेहमी विद्युत मोटार, केबल व शेती साहित्य चोरीच्या घटना सतत घडतात. येथील तापी नदी पात्रात वाहून येणारे प्रेत, महामार्गावर होणारे अपघात, लोकांच्या तक्रारी व इतर गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी या पोलीस दूरक्षेत्रात फक्त चार पोलीस कर्मचारी नियुक्त आहेत.
दोन राज्यांना जोडणारे गाव
प्रकाशा हे गाव गुजरात व मध्य प्रदेश या दोन राज्यांना लागून आहे. शिवाय गावातून अंकलेश्वर-बऱ्हाणपूर व प्रकाशा-तोरणमाळ हा रस्ता जातो. त्यामुळे या रस्त्यांवर वाहनांची वर्दळ वाढली आहे. या रस्त्यांची कामे सुरू असल्याने दररोज ठप्प होणारी वाहतूक, अपघात, परराज्यांत जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांची तपासणी यासह पोलीस दूरक्षेत्राच्या कार्यक्षेत्रातील इतर गुन्हेगारी घटनांवर वचक निर्माण करणे व घटनांचा तपास करण्यासाठी पुरेसे पोलीस कर्मचारी असणे आवश्यक आहे.
दीड एकर जागा उपलब्ध
प्रकाशा येथे पोलीस स्टेशनसाठी पोलीस अधीक्षक धुळे यांच्या नावाने दीड एकर जागा आहे. मात्र, या जागेवर फक्त २० बाय २० आकाराची पोलीस दूरक्षेत्रासाठी खोली बांधण्यात आली आहे. रिकाम्या जागेत जप्त केलेली वाहने, काटेरी झुडपे यामुळे घाण साचली आहे. काही लोक मुतारी व शौचालयासाठी या जागेचा वापर करतात व वराहांचा कायम वावर राहत असल्याने दुर्गंधी पसरते.
वरिष्ठांनी दखल घेणे गरजेचे
महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश या तीन राज्यांतील भाविकांची वर्षभर प्रकाशा तीर्थक्षेत्रावर दर्शनासाठी गर्दी असते. तापी नदी व बॅरेज यामुळे होणाऱ्या दुर्घटना, महामार्गामुळे होणारे अपघात व इतर गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी स्वतंत्र पोलीस अधिकारी व कर्मचारी संख्या वाढविण्याची गरज आहे. पोलीस स्टेशनसाठी जागाही उपलब्ध आहे. या जागेला तारेचे कंपाऊंड करण्यासाठी काही वर्षांपूर्वी तत्कालीन पोलीस अधीक्षकांनी १० हजार रुपये मंजूर केले होते. मात्र, एवढ्या कमी रकमेत हे काम होणार नव्हते म्हणून ही रक्कम परत पाठविण्यात आली होती. सध्याची परिस्थिती पाहता स्वत: जिल्हा पोलीस अधीक्षकांनी भेट दिल्यास या गोष्टीला चालना मिळेल, तसेच प्रकाशा येथे स्वतंत्र पोलीस स्टेशन कार्यान्वित करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची गरज आहे.