३२ हजार रोख व चांदीचे दागिने असलेली बॅग पोलिसाने केली परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 12:36 IST2020-02-02T12:36:41+5:302020-02-02T12:36:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : खाकीच्या धाकाची अथवा तो ओसरण्याची बाब नेहमीच चर्चीली जाते. परंतु या खाकीतही माणुसकी असते ...

३२ हजार रोख व चांदीचे दागिने असलेली बॅग पोलिसाने केली परत
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : खाकीच्या धाकाची अथवा तो ओसरण्याची बाब नेहमीच चर्चीली जाते. परंतु या खाकीतही माणुसकी असते हे वेळोवेळी घडलेल्या घटनांवरून सिद्ध झाले आहेच. अशीच एक आदर्शवत घटना शहादा येथे घडली. ३२ हजार रुपये रोख आणि चांदीचे दागीने असलेली बॅग पोलीस कर्मचाऱ्याला सापडली, आणि त्यांनी ती संबधित व्यक्तीपर्यंत पोहचविली.
म्हसावद, ता. शहादा येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले हवालदार भगवान धात्रक यांना ३१ रोजी शहादा बसस्थानकासमोरील जवाहर स्टोअर्स जवळ बेवारस बॅग आढळली. त्यांनी आजूबाजूला शोध घेतला परंतु कोणीही आढळून आले नाही. या बॅगेत ८० भार वजन असलेले दोन चांदीचे कडे व २०० रुपयांचा ९९ नोटा, ५०० रुपयांचा २५ नोटा असे एकुण ३२ हजार ३०० रुपये रोख आणि इतर ऐवज मिळून आला. सदर बॅगेचा मालकाची ओळख पटावी म्हणून पोलीस भगवान धात्रक यांनी शोधाशोध केली असता बॅगेत मालकाचे आधार कार्ड मिळाले. सदर व्यक्ती हा धडगाव तालुक्यातील उमराणे येथील रहिवासी असल्याचे तपासात आढळून आले. पोलीस धात्रक यांनी उमराणे येथील पोलीस पाटील दिलीप पावरा यांच्याशी संपर्क साधून सदर इसम हा तोच आहे याची खात्री झाली.
पोलीस पाटील यांनी बागेचे मालक कांद्या शेवल्या पावरा उमराणी, ता.धडगाव यांना शहादा येथे पोलीस उपविभागीय कार्यालयात पाठविले. उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक सपकाळे यांच्या उपस्थितीत पावरा यांना बॅग देण्यात आली. शिवाय हवालदार धात्रक यांचेही कौतूक केले. यावेळी म्हसावद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार आणि शहादा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते. यावेळी कांद्या पावरा यांनी पोलिसांचे आभार मानले.