दरोड्यातील संशयीतांपर्यंत पोहचण्यात पोलिसांना अपयश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 12:29 IST2020-08-25T12:29:30+5:302020-08-25T12:29:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील डी.सी.डेव्हलपर्सच्या कार्यालयातील कथीत दरोड्यातील संशयीत पोलिसांना चकवा देत आहेत. गुजरात व राजस्थानला गेलेल्या ...

दरोड्यातील संशयीतांपर्यंत पोहचण्यात पोलिसांना अपयश
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील डी.सी.डेव्हलपर्सच्या कार्यालयातील कथीत दरोड्यातील संशयीत पोलिसांना चकवा देत आहेत. गुजरात व राजस्थानला गेलेल्या पथकांना चार दिवसात संशयीतांपर्यंत पोहचण्यात यश आलेले नाही. दरम्यान, मुख्य संशयीत उमेदसिंग याची पोलीस कोठडी मंगळवार २५ रोजी संपणार आहे. त्याची पोलीस कोठडी वाढवून मिळावी यासाठी पोलिसांचा प्रयत्न राहणार आहे.
नंदुरबारातील गणपतीमंदीर रोडवरील डीसी डेव्हलपर्सच्या कार्यालयात तेथे काम करणाऱ्या नोकराच्या माध्यमातून त्याच्यासह चार जणांनी दरोड्याचा बनाव करून १५ लाख ६९ हजार रुपये लुटले होते. शिवाय आदल्या रात्री याच कार्यालयातील एका कर्मचाºयाच्या घरातून देखील चार लाख रुपये लांबविले होते. पोलिसांनी अवघ्या काही तासात या दरोड्याच्या बनाव उघड केला होता.
याप्रकरणी देवेंद्र चंदनमल जैन यांच्या फिर्यादीवरून उमेदसिंग याच्यासह त्याच्या इतर तीन साथीदारांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटना घडल्यानंतर या घटनेतील इतर तीनजण रक्कम घेऊन फरार झाले होते. तर उमेदसिंग याला अटक करण्यात आली होती. त्याला न्यायालयात उभे केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती. त्याच्या पोलीस कोठडीची मुदत मंगळवार, २५ आॅगस्ट रोजी संपणार आहे. त्यामुळे त्याला पुन्हा न्यायालयासमोर उभे करण्यात येणार असून पोलीस कोठडीची मुदत वाढवून मागविण्यात येणार असल्याची सूत्रांनी सांगितले.
संशयीतांचा गुंगारा
फरार झालेले तिन्ही संशयीत हे पोलिसांना गुंगारा देत आहे. त्यांच्या शोधासाठी १९ रोजी रात्रीच पथक गुजरात व राजस्थानमध्ये पाठविण्यात आले आहे. या पथकाला या संशयीतांपर्यंत पोहचण्यात अद्यापही यश आलेले नाही.
संशयीत नियमितपणे आपला ठिकाणा बदलवत असल्याचे समजते. मोबाईल लोकेशनचाही उपयोग होत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे पथकाच्या हाती काहीही लागत नसल्याचे चित्र आहे. संशयीत सापडत नाहीत तोपर्यंत पथकाला त्यांच्या मागावर राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
स्थानिक गुन्हा अन्वेशन विभागाने देखील संशयीतांच्या तपासासाठी विविध माध्यमातून प्रयत्न सुरू ठेवले आहेत. संशयीतांच्या मुळ गावच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांशीही संपर्क साधला जात आहे.
दरम्यान, भरदिवसा झालेल्या या दरोड्यातील संशयीतांपर्यंत पोहचण्यात पोलिसांना येत असलेल्या अपयशामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.
संशयीत सापडत नसल्यामुळे पोलिस देखील हवालदिल झाले आहेत.
पथके संशयीतांच्या मागावर असून त्यांना लवकरच जेरबंद केले जाईल असा विश्वास पोलीस निरिक्षिक सुनील नंदवाळकर यांनी व्यक्त केला.
नागरिकांमध्ये अद्यापही भितीचे वातावरण कायम आहे.त्यामुळे लवकरात लवकर तपास लागणे आवश्यक आहे.