बालिकेच्या शोधासाठी पोलीसही सरसावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 14:16 IST2021-01-21T14:15:43+5:302021-01-21T14:16:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : ऊस तोड मजुराची जखमी बालिका घेऊन पसार झालेल्या दुचाकीस्वाराचा शोध घेण्यात दुस-या दिवशीही अपयश ...

बालिकेच्या शोधासाठी पोलीसही सरसावले
लोकमत न्यूज नेटवर्क
कोठार : ऊस तोड मजुराची जखमी बालिका घेऊन पसार झालेल्या दुचाकीस्वाराचा शोध घेण्यात दुस-या दिवशीही अपयश आले. या खळबळजनक घटनेमुळे ऊसतोड मजुरांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. दिवसभर नातेवाईक, पोलीस यांनी जखमी बालिकेचा शोध घेण्यासाठी जंग जंग पछाडले होते. ते दुचाकीस्वार कोण, बालिकेला कुठे घेऊन गेले,त्यांचा उद्देश काय? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, धडगाव तालुक्यातील काकडद्याच्या घाटली-आगरीपाडा येथिल मोत्या काल्या पटले हे ऊसतोड मजूर नोव्हेंबर महिन्यापासून तळोदा-बोरद रस्त्यालगत कढेल फाट्याजवळील शेतात वास्तव्यास आहेत. त्यांच्यासह १४-१५ कुटुंबीय असून ते ऊसतोडणीचे काम करतात.
मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास हे ऊसतोड मजूर नेहमीप्रमाणे ऊस तोडून गाडी काम करत होते. त्याचवेळी मुन्नी मोत्या पटले ही दहा वर्षीय बालिका रस्ता ओलांडून पलीकडच्या शेतात लहान चुलत भावासोबत पाणी भरण्यासाठी गेली होती. पाणी भरून ती रस्ता ओलांडत असतांना मोड कडून तळोदाकडे भरधाव जाणाऱ्या काळ्या रंगाच्या दुचाकीस्वारांनी तीला जोरदार धडक दिली. या अपघातात मुन्नी ही काटेरी झुडपांमध्ये फेकली गेल्याने गेली. तिला जबर दुखापत झाली व तिच्या नाका तोंडातुन रक्त येण्यास सुरुवात झाली. यानंतर भयभीत झालेल्या दुचाकीस्वार मुन्नीला दवाखान्यात घेऊन जातो असे सांगून मोटारसायकल बसवून परत मोड गावाच्या दिशेने घेऊन गेले.
हा सर्व प्रकार तिचा सोबत असणाऱ्या लहान भावाने ऊसाची गाडी भरणाऱ्या मुन्नीच्या आईवडीलांना व सहकाऱ्यांना सांगितली. त्यानंतर त्या सर्वांना तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्याठिकाणी त्यांना रक्त सांढलेले आढळून आले व धडक देणाऱ्या दुचाकींस्वार मुलीला मोड कडे घेऊन गेल्याची माहिती दिली. त्यानंतर त्या सर्वांनी मोड येथील दवाखान्यात मुन्नीचा शोध घेतला पण त्यांना कुठेही मुन्नी आढळून आली नाही.त्यांनी परिसरातील बोरद, तऱ्हावद, वैजाली, प्रकाशा इत्यादीसह परिसरातील गावातील दवाखान्यात मुन्नीचा मंगळवारी रात्री उशीरापर्यत शोध घेतला असता त्यांना अशा प्रकारची अपघात झालेली बालिकेला उपचारासाठी आणण्यात आले नसल्याची माहिती मिळाली. त्यामुळे ते दुचाकीस्वार अपघातात जखमी झालेल्या मुन्नीला नेमके कुठे घेऊन गेलेत याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती मिळू न शकल्याने पटेल कुटुंबिय चिंताग्रस्त झाले आहे.
दरम्यान, अपघातग्रस्त मुन्नी नेमकी कुठे आहे व कशी आहे याबाबत पटले कुटुंबीय अनभिज्ञ असून मुन्नीची आई रडून बेजार झाली आहे. संपूर्ण काकडदा ग्रामस्थ चिंतातुर झाले असून मुन्नी चा ते शोध घेत आहेत.अपघातात जखमी झालेली मुन्नी बेपत्ता होऊन २४ तासांपेक्षा अधिक कालावधी उलटला आहे.
गावकडील नातेवाईक देखील दाखल...
या घटनेचा निरोप पटले कुटुंबियांनी आपल्या मूळ गावी काकडदा येथे दिल्यानंतर मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली व बुधवार सकाळपासून मुन्नीच्या शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र सायंकाळीपर्यत कोणत्याही प्रकारची माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही. मुन्नीच्या वडीलांनी बुधवारी दुपारी तळोदा पोलिस स्टेशनला या घटनेची माहिती कळविल्यानंतर पोलीसांनी देखिल शोध कार्याला सुरुवात केली असल्याचे समजते. पोलिसांनी जिल्ह्यातील सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामिण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, याठिकाणी भेटी देऊन याबाबत विचार पूस केली मात्र मुनी आढळून आली नाही.