लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : वाघेश्वरी चौफुली ते भोणे फाटा रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम पुर्ण होण्याआधीच उखडण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे कामाच्या दर्जाबाबत शंका उपस्थित केली जात आहे. धरणगाव ते धानोरा या राज्य मार्गाच्या नंदुरबार शहरातील वाघेश्वरी चौफुली ते भोणेफाटा र्पयतच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येत आहे. काम सुरू झाल्यापासूनच ठेकेदाराने मनमानी सुरू केली आहे. सुरुवातीचे दोन महिने नागरिकांना गुडघ्याएवढय़ा चिखलातून वाहने काढावी लागली. आता एका बाजुचा रस्ता पुर्ण करून तो वापरास सुरु करण्यात आला आहे. परंतु या रस्त्याचे काम पुर्ण होण्याआधीच रस्त्यावर खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. एका ठिकाणी तर खड्डा पडून त्यातून लोखंडी सळई बाहेर येवू लागल्या आहेत. काम पुर्ण होण्याआधीच ही स्थिती असेल तर पुढील काळात या रस्त्याची अवस्था काय होईल याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे या रस्त्याला जोडणा:या दोन्ही बाजुच्या वसाहतींमध्ये जाणा:या रस्त्यांची अवस्था देखील खराब झाली आहे. गोपाळनगर वसाहतीत जाण्यासाठी नागरिकांना चिखल आणि खड्डयांमधून मार्गक्रमण करावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. या कामावर देखरेख करणे आणि गुणवत्तेची तपासणी करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाचे असतांना दुर्लक्ष आहे. यामुळे ठेकेदाराचे फावले आहे.
काम पुर्ण होण्याआधीच रस्त्यात खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 12:14 IST