Perform 500 corona tests daily | दररोज ५०० कोरोना चाचण्या करा

दररोज ५०० कोरोना चाचण्या करा


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोना प्रतिबंधात्मक उपायाच्या संदर्भात प्रशासनाने आतापर्यंत चांगली कामगिरी केली असून यापुढील काळात जिल्ह्याच्या दुर्गम आणि डोंगराळ भागात कोरोनाचा प्रसार होणार नाही यासाठी विशेष दक्षता घेण्यात घ्यावी, दररोज किमान ५०० चाचण्या कराव्या असे प्रतिपादन नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, अप्पर जिल्हाधिकारी महेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, अविश्यांत पंडा, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शैखर रौंदळ, आदी उपस्थित होते.
गमे म्हणाले, प्रतिबंधीत क्षेत्रात अतिजोखमीच्या व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात यावे. प्रतिबंधीत क्षेत्रातील नागरिकांकडून नियमाचे कटाक्षाने पालन होईल याकडे विशेष लक्ष द्यावे. कोरोना बाधीत व्यक्तिंच्या संपकार्तील व्यक्तिंची त्वरीत स्वॅब चाचणी घेण्यात यावी. ग्रामीण भागातील स्थानिक डॉक्टरांकडील तापाच्या रुग्णाची माहिती घ्यावी. मास्क न घालणाऱ्या व सामाजिक अंतराचे पालन न करणाºया व्यक्तीं विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले. रुग्णासाठी पुरेशा प्रमाणात आॅक्सिजन सिलेंडर उपलब्ध होण्याच्या दृष्टीने नियोजन करावे.
आरोग्य कर्मचाऱ्यांचा रिक्तपदाचा आढावा घेऊन कंत्राटी तत्वावर आवश्यक ती पदे त्वरीत भरण्यात यावीत. दुर्गम भागात आवश्यकतेनुसार अ‍ॅन्टीजन टेस्टचा उपयोग करावा. दररोज किमान ५०० व्यक्तींची स्वॅब चाचणी करण्यात यावी. कोरोनामुळे होणाºया मृत्यूच्या कारणाचे विश्लेषण करुन मृत्यूदर कमी करण्याचा प्रयत्न करावा असे आयुक्त गमे यांनी सांगितले.
महसूलचे काम समाधानकारक
कोरोना संकटाच्या परिस्थितीत जिल्ह्यातील महसूली कामकाज समाधानकारक असल्याचे गमे म्हणाले. मनरेगा अंतर्गत अधिकाधिक कामे घेण्यात यावीत. सिंचन विहीरीची अपूर्ण कामे पूर्ण करावीत. मंजूर असलेले घरकुलाची कामे सुरु होण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. पाणंद व शिवार रस्त्यांच्या कामाबाबत आवश्यक अ‍ॅप तयार करण्यात यावे. ‘विकेल ते पिकेल’ योजनेचा अधिकाधिक प्रसार करावा, असे त्यांनी सांगितले.
यावेळी विभागीय आयुक्तांनी ई -फेरफार, महाराजस्व अभियान, आधार प्रमाणिकरण, आधार नोंदणी, पी.एम.किसान योजना, पीककर्ज वाटप, महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना, कापूस खरेदी आदी विविध विषयाचा आढावा घेतला.
कोविड रुग्णालयाला भेट
विभागीय आयुक्तांनी जिल्हा रुग्णालय परिसरातील आरटीपीसीआर लॅब व कोविड हॉस्पिटलला भेट देऊन तेथील व्यवस्थेची माहिती घेतली. त्यांनी एकलव्य कोविड केअर सेंटर येथे भेट दिली व तेथील सुविधांबाबत समाधान व्यक्त केले. भविष्यात बाधितांची संख्या वाढल्यास त्यादृष्टीने आवश्यक नियोजनाबाबत त्यांनी सूचना दिल्या.
 

Web Title: Perform 500 corona tests daily

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.