मेडिकल कॉलेजमधील विविध पद भरतीसाठी मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:24 IST2021-05-30T04:24:46+5:302021-05-30T04:24:46+5:30
नंदुरबार येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी शासनाने २० नोव्हेंबर २०२० अन्वये प्रथम वर्षासाठी वर्ग-१ ...

मेडिकल कॉलेजमधील विविध पद भरतीसाठी मार्ग मोकळा
नंदुरबार येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी शासनाने २० नोव्हेंबर २०२० अन्वये प्रथम वर्षासाठी वर्ग-१ ते वर्ग - ३ ची नियमित १११ पदे निर्माण करण्याबाबत तसेच ५४ काल्पनिक पदे (बाह्यास्त्रोताने / कंत्राटी) अशी एकूण १६५ पदे निर्माण करण्यास मान्यता दिली आहे. उच्चस्तरीय समितीच्या मान्यतेची अट शिथिल करून आवश्यक तेवढी पद निर्मिती करण्यास व पदे भरण्यास मान्यता दिली आहे. त्याच धर्तीवर शैक्षिणक वर्ष २०२०-२०२१ पासून सुरू झालेल्या नंदुरबार शासकीय वैद्यकीय उच्चस्तरीय समितीच्या मान्यतेने पद निर्मिती केली आहे.
आता महाविद्यालय व रुग्णालयासाठी उर्वरित आवश्यक पदांची निर्मिती करण्यास व पदे भरण्यासदेखील उच्चस्तरीय समितीच्या मान्यतेची अट शिथिल करण्यास मान्यता दिली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या मानकानुसार वर्षनिहाय, आवश्यक पदनामनिहाय पदनिर्मिती आवश्यक असल्यामुळे संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांनी सादर केल्यानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नंदुरबार येथील द्वितीय, तृतीय व चतुर्थ वर्षासाठी पदनिर्मितीस मान्यता देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधिन होता. त्यास गुरुवारी मान्यता मिळाली. तसा आदेश राज्याचे सचिव शिवाजी पाटणकर यांनी निर्गमित केला असल्याची माहिती खासदार डॉ.हीना गावीत यांनी दिली.
पदे व संख्या
नंदुरबार येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी विवरण पत्रानुसार द्वितीय, तृतीय व चतुर्थ वर्षासाठी गट - अ ते गट - क मधील नियमित ११२ पदे, विद्यार्थी पदे ८३ तसेच गट - क (काल्पनिक पदे - बाह्यस्त्रोताने) ९८ पदे, गट - ड (काल्पनिक पदे - बाह्यस्त्रोताने) ४० पदे, अशी एकूण ३३३ पदे तीन टप्प्यात निर्माण करण्यास मान्यता मिळाली आहे.