कोंढावळ येथेही आढळला रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 13:23 IST2020-08-07T13:22:54+5:302020-08-07T13:23:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : शहादा तालुक्यातील कोंढावळ येथील ३० वर्षीय महिलेला धुळे येथे खाजगी रुग्णालयात कमरेवरील शस्त्रक्रियेसाठी दाखल ...

कोंढावळ येथेही आढळला रुग्ण
लोकमत न्यूज नेटवर्क
सारंगखेडा : शहादा तालुक्यातील कोंढावळ येथील ३० वर्षीय महिलेला धुळे येथे खाजगी रुग्णालयात कमरेवरील शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात आले होते. या महिलेचे स्वॅब घेऊन जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यात स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह आला असून औषधोपचार करून नंदुरबार जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आल्याचे समजते.
कोंढावळ, ता.शहादा येथील ३० वर्षीय महिलेला कमरेचा त्रास होत असल्याने तिला धुळे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ५ आॅगस्ट रोजी या महिलेवर शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. त्याआधी स्वॅब घेण्यात येऊन धुळे जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यात अहवाल पॉझिटीव्ह आल्याने या महिलेला नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात पुढील उपचार घ्यावा, असे सांगण्यात आल्याचे समजते. त्यानंतर धुळे येथून खाजगी वाहनाने ही महिला व तिचा पती हे रात्री उशिरा कोंढावळ येथे आले. त्यांनी स्वत:हून गावाबाहेरील दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतावरच होम क्वारंटाईन राहण्याचा निर्णय घेतला. पोलीस पाटील सुरेशगिरी गोसावी यांना कळविल्यानंतर त्यांनी तात्काळ वडाळी येथील आरोग्य केंद्रात कळवले. वैद्यकीय अधिकारी डॉ.राजन दुगड, उपकेंद्र आरोग्य सेविका इंगळे आदींनी शेतावर जाऊन दोन्ही पती-पत्नीची तपासणी करून शहादा येथील विलगीकरण कक्षात पाठवण्यात आले.
सारंगखेड्यात पुन्हा एक रुग्ण
सारंगखेडा येथे गेल्या आठवड्यात खाजगी वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर दाम्पत्यास इंदूर (मध्य प्रदेश) येथे कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्या संपर्कातील १२ जण बाधित झाले होते. बुधवारी रात्री उशिरा त्यांच्या संपर्कातील घरकाम करणाऱ्या ३५ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर आता बाधित रुग्णांची संख्या १३ झाली आहे. त्या महिलेच्या संपर्कातील १९ जणांना आरोग्य विभागाकडून क्वारंटाईन करण्यात आले असून आरोग्य विभागाकडून त्या परिसरात पुन्हा सर्वेक्षण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. बाधित रुग्णाच्या संपर्कातील लोकांची साखळी तोडण्यासाठी आरोग्य विभागाला कसोशीने प्रयत्न करावे लागणार आहे. ग्रामस्थांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये व शासनाच्या नियमांचे पालन करावे. त्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामपंचायत, पोलीस प्रशासन व आरोग्य विभागासह जि.प.चे माजी उपाध्यक्ष उपाध्यक्ष जयपालसिंह रावल, पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेंद्र पेंढारकर, ग्रामविकास अधिकारी संजय मंडळे आदींनी केले आहे.
दरम्यान, शहादा तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंतेचा विषय ठरत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक गावांमध्ये ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यूही पाळला. मात्र रुग्णांची संख्या वाढत असल्याने ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.