नवापुरचा रूग्ण सुरतला झाला कोरोना बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 13:01 IST2020-07-11T13:01:36+5:302020-07-11T13:01:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : शहरातील राजीव नगर भागात पोस्ट कार्यालय परिसरातील एका ७२ वर्षीय वृद्धेचा कोरोना अहवाल गुरूवारी ...

The patient from Navapur became infected with corona in Surat | नवापुरचा रूग्ण सुरतला झाला कोरोना बाधित

नवापुरचा रूग्ण सुरतला झाला कोरोना बाधित


लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : शहरातील राजीव नगर भागात पोस्ट कार्यालय परिसरातील एका ७२ वर्षीय वृद्धेचा कोरोना अहवाल गुरूवारी रात्री पॉझिटीव्ह येताच प्रशासनाने रात्रीच परिसर सील करून उपाय योजना केली. शहरात तिसरा व्यक्ती पॉझिटीव्ह झाल्याने रूग्ण संख्येत होत असलेली वाढ चिंताजनक आहे.
राजीव नगर भागातील ७२ वर्षीय वृद्ध व्यक्तीला हृद्यविकाराचा झटका आल्याने सुरत येथील एका खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना तेथून रजा दिल्याने ते दोन दिवस आधी घरी आले होते. घरी आल्यावर त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्याने तपासणीसाठी नंदुरबार जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले. तेथून त्यांना सुरत येथे उपचारासाठी पाठविण्यात आले असता त्यांच्या स्वॅबचा अहवाल गुरूवारी रात्री पॉझिटीव्ह आला. त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याची माहिती गुरूवारी रात्री उशिरा तालुका प्रशासनाला कळाल्यानंतर प्रशासनाने ताबडतोब राजीव नगरच्या त्या परिसराकडे धाव घेतली. या वेळी तहसीलदार सुनिता जºहाड, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांनी उपनगराध्यक्ष आरिफ बलेसरीया, नगरसेवक अय्युब बलेसरीया, माजी उपनगराध्यक्ष रमेशचंद्र राणा यांच्या मदतीने खबरदारीचे सर्व उपाय योजलेत. संबंधीत रूग्ण राहत असलेला भाग बॅरीकेटींग लावून सील करून तो परिसर प्रशासनाने कंटेनमेंट झोन घोषित केला.
आरोग्य विभागातर्फे तातडीने दक्षतेचा उपाय म्हणून परिसरात राहणाऱ्या ४५ घरांचे डोअर टू डोअर सर्वेक्षण करून थर्मल स्कॅनिंग केले. या रूग्णाच्या संपर्कातील लोकांना शोधून क्वारंटाईन करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे.
शहरातील मंगलदास पार्क स्थित ६५ वर्षीय महिला, लगतच्या जनता पार्क येथील ५५ वर्षीय पुरूष रूग्ण व राजीव नगरमधील ७२ वर्षीय वृद्ध असे तीन जण कोरोना पॉझिटीव्ह झाले आहेत. विसरवाडी परिसरातील गडदाणी येथील एका पुरूषाचा सर्वात आधी आलेला पॉझिटीव्ह अहवाल मिळून तालुक्याची संख्या चार झाली आहे. त्यात गडदाणी येथील रूग्ण बरा झाला आहे. मंगलदास पार्कमधील वृध्द महिलेच्या प्रकृतीत समाधानकारक सुधारणा असून जनता पार्कमधील पुरूष रूग्णाच्या प्रकृतीतही सुधारणा असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. कोरोना बाधित रूग्णाच्या संख्येत वाढ होत असल्याने सरकारी यंत्रणेसह तालुक्यातील जनतेच्या चिंता वाढल्या आहेत. या सर्व रूग्णांची ट्रॅव्हल हिस्ट्री आहे हे विशेष.
प्रशासनाने सावधगिरीचा उपाय म्हणून विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता जास्त सतर्क राहुन शासनाच्या सर्व नियमांचे पालन करावे, विनाकारण घराबाहेर पडू नये व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदार सुनिता जºहाड, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, पोलीस निरिक्षक विजयसिंग राजपूत, पालिका मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.शशिकांत वसावे यांनी केले आहे.
नवापूर तालुक्यात जनता कर्फ्यूनंतर ६८ दिवसांनी १ जून रोजी पहिला रूग्ण विसरवाडी परिसरात गडदाणी गावात आढळून आला. काही दिवसांनी ते तंदुरूस्तही झाले. ३ जुलैला मंगलदास पार्कमधील वृद्ध महिलेचा रिपोर्ट पॉझिव्हिट आला. त्यांची प्रकृती स्थिर आहे. ७ जुलै रोजी रात्री जनतापार्कमधील एक पुरुष रूग्ण पॉझिटीव्ह जाला. ९ जुलैला ७२ वर्षीय वयोवृद्ध पुरूष व्यक्तीचा अहवाल सुरतहून पॉझिटीव्ह आला आहे. आतापर्यंत चार रूग्ण नवापूर तालुक्यात पॉझिटीव्ह आढळून आले आहे. चौघांची प्रवास हिस्ट्री हॉटस्पाट भागातील आहे. नंदुरबार जिल्ह्यात धडगाव सोडून इतर सर्व तालुक्यात कोरोनाचा आकडा दशक पार करून गेला असला तरी नवापूर तालुक्यात ही संख्या चार अशी नियंत्रणात आहे.

Web Title: The patient from Navapur became infected with corona in Surat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.