नंदुरबार : लॅाकडाऊन शिथिल केल्यानंतर बाजारात वाढणारी गर्दी पाहता कोरोना पुन्हा डोके वर काढू लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून ५ ते १५ संख्येने येणारी रुग्णसंख्या शुक्रवारी थेट २४ वर गेली आहे तर मृतांचा आकडादेखील पाचपर्यंत गेला आहे. त्यामुळे प्रशासनाने योग्य उपाययोजना करणे गरजेचे ठरणार आहे.
१ जूनपासून लॅाकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. सर्वच वस्तू विक्रीची दुकाने सुरू करण्यात आली आहेत. बाजाराची वेळ देखील दुपारी २ वाजेपर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे बाजारात गर्दी वाढू लागली आहे. बाजारात येतांना नागरिक सोशल डिस्टन्सिंग विसरत आहेत. काहीजण मास्कदेखील वापरत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे कोरोनाला पुन्हा आमंत्रण देण्याचा प्रकार दिसून येत आहे. त्याचाच परिणाम म्हणून शुक्रवारी कोरोना रुग्णांची संख्या २४ पर्यंत गेली आहे.
गेल्या आठ दिवसांपासून रुग्ण संख्या ५ ते १५ दरम्यान येत होती. गुुरुवारी तर रुग्णसंख्या अवघी एक आकडी आली होती. पाच महिन्यात पहिल्यांदाच एक आकडी रुग्णसंख्या आल्याने दिलासा मिळाला होता. मृतांचा आकडा देखील कमी झाला होता. बाजारातील वाढती गर्दी आता कोरोनाला आमंत्रण देऊ लागली असल्याचे चित्र आहे.