धावती रेल्वे पकडतांना हात सटकल्याने प्रवासी कापला गेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 11:36 IST2019-04-05T11:36:04+5:302019-04-05T11:36:30+5:30
नंदुरबार स्थानक : रुग्णवाहिकेअभावी दोन तास मृतदेह पडून

धावती रेल्वे पकडतांना हात सटकल्याने प्रवासी कापला गेला
नंदुरबार : धावती रेल्वे पकडण्याच्या प्रयत्नात असलेल्या प्रवाशाचा हात सटकून रेल्वेखाली आल्याने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास नंदुरबार रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर घडली़ याबाबत नंदुरबार लोहमार्ग पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़
लोहमार्ग पोलीस ठाण्यात मृत्यू झालेल्या व्यक्तीची अज्ञात म्हणून नोंद करण्यात आली असली तरी, संबंधिताकडे पद्मशाली शंकर या नावाचे आधारकार्ड मिळाले आहे़ त्यामुळे मृत्यू झालेला व्यक्ती हा तोच असल्याचा निष्कर्ष काढण्यात येत आहे़ मृताकडे असलेल्या दस्ताऐवजावरुन त्याच्या नातेवाईकांना सूरत येथे फोन करण्यात आला असून मृताची बहिण मृतदेह ओळखण्यासाठी नंदुरबारात रात्री उशिरा दाखल होणार असल्याची माहिती देण्यात आली़ दरम्यान, नावावरुन मृत व्यक्ती दाक्षिणात्य असून कामानिमित्त सूरत येथे स्थायिक झाली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे़ आधार कार्डवरदेखील गोविंद नगर, लिंबायत, सूरत़ असा पत्ता असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे़
मृतदेह झाला चेंदामेंदा
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह रेल्वेखाली आल्याने संपूर्णपणे चेंदामेंदा झालेला होता़
रेल्वेच्या चाकात मृतदेह अडकल्याने रेल्वेला रिव्हर्स घेऊन अस्ताव्यस्त पसरलेला मृतदेह व अवशेष लोहमार्ग पोलिसांकडून बाहेर काढण्यात आला होता़ दरम्यान, मृतदेहाला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका बोलविण्यात आली होती़ परंतु प्रत्यक्षात दोन तासानंतर रुग्णावाहिका आल्याने संबंधित मृतदेह बराच वेळ घटनास्थळी पडून होता़
दरम्यान, एपीआय चिंतामन आहेर, पीएसआय माधव जिव्हारे, एएसआय गोविंद काळे, हवालदार आऱआऱ पाटील, शुभम देशमुख आदींच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला होता़ उपस्थित सर्वच प्रवासी मृतदेहाचा फोटो तसेच व्हिडीओ काढण्यात मग्न होते़ परंतु कुणीही मृतदेह बाहेर काढण्यास पोलीस कर्मचाऱ्यांना मदत केली नसल्याचे सांगण्यात आले़ सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृत व्यक्त ही रेल्वे बराच वेळ नंदुरबार स्थानकावर थांबत असल्याने जेवन करीत होती़ कुठलीही पूर्वसूचना न देता अचानक रेल्वे सुरु झाल्याने हातातच जेवनाचे ताट घेऊन धावती रेल्वे पकडण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याची माहिती आहे़ जर रेल्वे सुरु होत असल्याची पूर्व सूचना मिळाली असती तर कदाचीत हा अपघात टाळता आला असता अशी माहिती आता समोर येत आहे़