डिझेल नसल्याने प्रवाशांना मनस्ताप सोसावा लागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:36 IST2021-09-07T04:36:55+5:302021-09-07T04:36:55+5:30

प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य घेऊन राज्य परिवहन मंडळातर्फे ग्रामीण भागासह मोठ्या शहरांसाठी शहादा आगारातून दररोज सुमारे ११२ शेड्युल चालविले ...

Passengers had to suffer due to lack of diesel | डिझेल नसल्याने प्रवाशांना मनस्ताप सोसावा लागला

डिझेल नसल्याने प्रवाशांना मनस्ताप सोसावा लागला

प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य घेऊन राज्य परिवहन मंडळातर्फे ग्रामीण भागासह मोठ्या शहरांसाठी शहादा आगारातून दररोज सुमारे ११२ शेड्युल चालविले जातात. कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमी गेल्या दीड वर्षात पासून अनियमित प्रवासी वाहतुकीमुळे आगाराचे उत्पन्न कमालीचे घटले आहे. राज्य शासनाने पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतुकीला परवानगी दिल्यानंतर शहादा आगारातून सुरुवातीला लांब पल्ल्याच्या व नंतर आंतरराज्य बस फेऱ्या सुरू करण्यात आल्या होत्या तर तालुक्यातील ग्रामीण भागातील महत्त्वाच्या गावांना बस फेऱ्या सुरू करण्यात आल्या असल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणात सोय झाली होती.

सोमवारी नेहमीप्रमाणे सकाळपासून शहादा आगारातून प्रवासी वाहतुकीला सुरुवात झाली. मात्र, डिझेलचा मुबलक साठा उपलब्ध नसल्याने त्याचप्रमाणे विभागीय कार्यालयाकडून डिझेलचा पुरवठा झाला नसल्याने सकाळी नऊ वाजेपासून लांब पल्ल्याच्या बससेवेला विलंब होऊ लागल्याने प्रवाशांनी स्थानिक अधिकारी व कर्मचाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर शहादा आगारात डिझेल उपलब्ध नसल्याने बसफेऱ्याना उशीर होत असल्याचे स्पष्ट झाले. शहादा-चोपडा, शहादा-सिन्नर, शहादा-नाशिक, शहादा-जळगाव या फेऱ्या सकाळी दहा वाजेपासून ठप्प पडल्या होत्या. परिणामी प्रवाशांना नाहक मनस्ताप सोसावा लागला.

प्रवाशांसह विद्यार्थ्यांनाही बसफेऱ्या विलंबाने होत असल्याने त्रास सोसावा लागला. अनेकांनी आपल्या घरी जाण्यासाठी खाजगी प्रवासी वाहतुकीचा सहारा घेतला तर पोळ्या निमित्त शहरात खरेदी करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा घरी जाण्यासाठी बस सेवा उपलब्ध नसल्याने आता घरी जावे कसे अशी विवंचना सतावत होती. डिझेल अभावी बस सेवा ठप्प झाल्याने कर्मचारीही हतबल झाले असल्याचे चित्र शहादा आगारात होते.

मी धरणगाव येथील रहिवासी आहे. मला शहादा-जळगाव बसणे धरणगाव येथील घरी जायचे होते. त्यासाठी मी सकाळी १० वाजेपासून शहादा बस स्थानकात आली होती. नियमित वेळेत बस लागली नाही म्हणून मी महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना विचारणा केली तर त्यांनी सुरूवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. बस कधी लागेल याबाबत अधिकृत माहिती कोणीही दिली नसल्याने आता मी घरी कशी जाणार ही चिंता मला सतावत आहे. - हेमलता सोनार, प्रवासी, रा.धरणगाव

आम्ही शाळेत आलो होतो. शाळा संपल्यानंतर फेस, ता.शहादा येथील आमच्या घरी जाण्यासाठी बसस्थानकावर आलो असता. आमच्या गावाकडे जाणारी बस लागलेली नव्हती. बराच उशीर झाल्यानंतर आम्ही कर्मचाऱ्यांना विचारले तर त्यांनी सांगितले की आगारात डिझेल उपलब्ध नसल्याने बस फेरी तात्पुरती बंद करण्यात आलेली आहे. बस सेवा कधी सुरू होईल याबाबत कुठलीही अधिकृत माहिती मिळाली नसल्याने गेल्या तीन तासापासून आम्ही बसस्थानकात आहोत. आता घरी जावे कसे हा प्रश्न आम्हाला सतावत आहे. - मनीषा पाटील, विद्यार्थी प्रवासी

राज्य शासनाच्या आदेशान्वये शहादा आगारातून नियमित बससेवा सुरू करण्यात आली आहे. शहादा आगाराला दररोज सहा हजार लिटर डिझेल याप्रमाणे दर एक दिवसाआड एक डिझेलचे टँकर लागते. सोमवारी सकाळी डिझेलच्या कमतरतेमुळे अनेक फेऱ्यांना विलंब झाला. आम्हाला विभागीय कार्यालयाकडून डिझेलचा पुरवठा केला जातो. मात्र, मुबलक प्रमाणात पुरवठा झाला नसल्याने आज वाहतुकीचे नियोजन कोलमडले आहे. इतरांकडून डिझेलच्या उपलब्धतेसाठी प्रयत्न केले जात आहे. उपलब्ध होणाऱ्या डिझेलच्या तुलनेत लांब पल्ल्याच्या व ग्रामीण भागातील बसफेऱ्या सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. - संजय कुलकर्णी, स्थानक प्रमुख, शहादा आगार

Web Title: Passengers had to suffer due to lack of diesel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.